पालिका शाळांकडे मूलभूत संपर्क यंत्रणाही नाहीत!
गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वत्र ‘माहिती आणि संपर्क तंत्रज्ञान’ (आयसीटी) यांचा डांगोरा पिटला जात असला तरी मुंबई महानगरपालिकेच्या तब्बल १ हजार शाळा दूरध्वनीसारख्या मूलभूत संपर्क यंत्रणेपासूच वंचित आहेत.
२००६-०७मध्ये पालिकेच्या शाळांमध्ये मोठा गाजावाजा करीत दूरध्वनी आणि इंटरनेट जोडणी देण्यात आली. परंतु, दूरध्वनी आणि इंटरनेट जोडणीची बिले भरण्यात न आल्याने दोनच महिन्यांत या सेवा मृतवत झाल्या. पालिकेने ही बिले भरण्यासाठीची आर्थिक तरतूदच त्या त्या वर्षीच्या अर्थसंकल्पात केली नव्हती. परिणामी एमटीएनएलने तब्बल ९० टक्के पालिका शाळांची दूरध्वनी व इंटरनेट जोडणी बंद करून टाकली आहे.
आज कुठल्याही विद्यार्थ्यांला निरोप द्यायचा झाला तर पालिका शिक्षक आपले व्यक्तिगत सेलफोन वापरतात. प्रत्येक मुलाला आपल्या सेलफोनवरून संपर्क साधणे आर्थिक भरुदडाचे ठरते म्हणून काही पालक मुलांच्या घरी जाऊन निरोप पोहोचविण्याचे काम करतात. मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीत ही अवस्था तर ग्रामीण भागात ती कशी असेल, असा प्रश्न यावरून पडतो.
या संबंधात ‘बृहन्मुंबई महापालिका शिक्षक सभे’चे रमेश जोशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या सगळ्याचे खापर पालिका प्रशासनावर फोडले. ‘एका स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेऊन पालिका शाळांमध्ये दूरध्वनी यंत्रणा बसवून घेतल्या. मात्र, ही यंत्रणा भविष्यात चालू राहावी, यासाठी पालिकेने कोणतीही काळजी घेतली नाही. परिणामी ही यंत्रणा बंद पडली आहे. आज फारच थोडय़ा पालिका शाळांमध्ये दूरध्वनी सेवा सुरू आहे,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. इंटरनेट सेवा सुरू नसल्याने विद्यार्थ्यांची व शिक्षकांची दर दिवसाची हजेरी शालेय शिक्षण विभागाकडे ऑनलाइन भरून देण्याची योजनाही पालिका शाळांमध्ये बारगळल्यात जमा आहे.
जिथे बाहेरच्या जगाशी संपर्क साधण्यासाठीची दूरध्वनीसारखी मूलभूत यंत्रणा नाही, तिथल्या विद्यार्थ्यांनी इतर खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करावी, ही अपेक्षा तरी कशी ठेवली जाते, असा सवाल एका शिक्षकाने केला. इतर शाळांमध्ये मुलांना वाट्टेल तितका वेळ इंटरनेट वापरू दिला जातो. इथे मुलांना त्यांच्या शैक्षणिक गरजांकरिताही इंटरनेट वापण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे, पालिका शाळांमधील मुले माहितीच्या हक्कापासून अनभिज्ञ राहिली तर आश्चर्य वाटायला नको, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
या संदर्भात पालिकेचे उपायुक्त (शिक्षण) सुनील धामणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा