सोलापूर जिल्ह्य़ात एकूण ३१ लाख ८२ हजार ५४२ मतदारांपैकी पाच लाख ७५ हजार ८५८ मतदारांची छायाचित्रे मतदारयाद्यांमध्ये नाहीत. छायाचित्रे नसलेल्या मतदारांनी आपली छायाचित्रे मतदारयाद्यांमध्ये समाविष्ट होण्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले आहे.
शंभर टक्के मतदारांची छायाचित्रे काढण्याचा कार्यक्रम गेल्या एप्रिलच्या मध्यापासून आखण्यात आला असून यात प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक याप्रमाणे विभागीय अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत एक लाख ३५ हजार ७९५ मतदारांची (२३.५८ टक्के) छायाचित्रे जमा करण्यात आली आहेत. छायाचित्रांसाठी मतदारांचा त्यांच्या निवासी पत्त्यावर जाऊन शोध घेतला जात आहे. पत्त्यावर न आढळणाऱ्या मतदारांची नावे मतदारयाद्यांतून वगळण्यात येणार असल्याचा इशाराही जिल्हाधिकारी डॉ. गेडाम यांनी दिला.
छायाचित्रे नसणाऱ्या मतदारांची संख्या पाच लाख ७५ हजार ८५८ एवढी असून यात सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक एक लाख २०२०, तर त्याखालोखाल शहर उत्तरमध्ये ९१ हजार २५८ मतदारांनी छायाचित्रे दिलेली नाहीत. तर दक्षिण सोलापूर मतदारसंघातील ८३ हजार ९३४ मतदारांची छायाचित्रे जोडली गेली नाहीत. छायाचित्रे जोडणी कार्यक्रमासाठी मतदारांनी विभागीय अधिकारी किंवा तहसील कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. गेडाम यांनी केले.