गणेश कारखाना भाडेतत्त्वावर चालू होणार असून अशोक कारखाना ५० हजार टन ऊस उपलब्ध करून देणार असल्याची माहिती निराधार आणि खोडसाळपणाची आहे. सन २०१०-११ च्या गळीत हंगामात पुरविलेल्या उसाच्या पेमेंटपैकी अद्यापही ६३ लाख ७५ हजार येणे असलेल्या रकमेच्या वसुलीसाठी गणेश कारखान्यावर दावा दाखल केलेला आहे. अशा स्थितीत माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यासारखा व्यवहारकुशल नेता अव्यवहारी निर्णय कसा घेईल, असा सवाल अशोक कारखान्याचे अध्यक्ष सुरेश गलांडे यांनी केला.
गणेश कारखाना अज्ञात कंपनीकडून भाडेतत्त्वावर सुरू करण्यात येणार असून अशोकच्या कार्यक्षेत्रातून ५० हजार टन उसाची उपलब्धता होणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्याने आपणास आश्चर्य वाटल्याचे गलांडे म्हणाले. सदरची माहिती कोणत्या आधारावर दिली हेच कळत नाही. अशोकच्या व्यवस्थापनाने सन २०१०-११ या गळीत हंगामात कार्यक्षेत्रातील अतिरिक्त उसाची विल्हेवाट लावण्यासाठी बाहेरच्या कारखानांना ऊस पुरविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गणेश कारखान्याला ३१ हजार टन उसाचा पुरवठा केला होता. या उसाच्या पेमेंटच्या येणे रकमेपैकी ६३ लाख ७५ हजार रकमेची वेळोवेळी मागणी करुनही गणेश कारखान्याने पेमेंट दिले नाही. अखेरीस थकित पेमेंटच्या वसुलीसाठी गणेश कारखान्यावर न्यायालयात दावा दाखल केल्याची माहिती गलांडे यांनी दिली.
अशा पाश्र्वभूमीवर आधीच्याच पेमेंटच्या वसुलीसाठी दावा दाखल असलेल्या गणेश कारखान्यास ऊस देण्याचा निर्णय कसा घेतला जाईल. तसेच गणेश कारखाना कोण सुरू करणार हे अद्याप अंधारात असताना करार कोणाशी करणार, असा सवाल त्यांनी केला. अशोकच्या व्यवस्थापनाच्या अपरोक्ष कोणी करार केला असल्यास आपणास माहिती नसल्याची मार्मिक टिप्पणीही गलांडे यांनी केली आहे. ते म्हणाले, गणेश कारखाना १५ वर्षांच्या कराराने भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यात येणार आहे.
वास्तविक कोणताही निर्णय घेताना संचालक मंडळाची मुदत जितकी आहे तितक्या कालावधीपुरता निर्णय घेता येतो, असे असताना गणेश कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाने थेट १५ वर्षे कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचा निर्णय कसा घेतला याचे आश्चर्य वाटते. यासंदर्भात अशोक कारखान्याकडून योग्य ती माहिती व तपशील घेणे आवश्यक होते. कोणताच आधार नसताना चुकीची माहिती देऊन अशोकच्या सभासद व ऊस उत्पादकांमध्ये संभ्रम निर्माण होण्यासाठी असा खोडसाळपणा केला असण्याची शक्यता गलांडे यांनी व्यक्त केली आहे.
‘गणेश’ला ऊस देण्याचे कोणतेच नियोजन नाही- गलांडे
गणेश कारखाना भाडेतत्त्वावर चालू होणार असून अशोक कारखाना ५० हजार टन ऊस उपलब्ध करून देणार असल्याची माहिती निराधार आणि खोडसाळपणाची आहे. सन २०१०-११ च्या गळीत हंगामात पुरविलेल्या उसाच्या पेमेंटपैकी अद्यापही ६३ लाख ७५ हजार येणे असलेल्या रकमेच्या वसुलीसाठी गणेश कारखान्यावर दावा दाखल केलेला आहे.
First published on: 01-12-2012 at 04:07 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No planning to give sugarcane to ganesh factory galande