देश व राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी केवळ छत्रपती शिवाजीमहाराजांच्या नावावर राजकारण न करता, त्यांचे व शाहूमहाराजांचे नाव घेऊन पुढे गेल्यास प्रगती होईल असे सांगतानाच आपल्याला राजकारणात मंत्री, खासदार, आमदार या पदांपेक्षाही छत्रपतिपद मोठे आहे, असे प्रतिपादन शिवाजीमहाराजांचे तेरावे वंशज युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केले.
शिव-शाहू रथ यात्रेनिमित्त शहरात आयोजित केलेल्या मराठा आरक्षण मेळाव्यात संभाजीराजे भोसले बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के होते. या वेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, कार्याध्यक्ष शांताराम कुंजीर, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, नगराध्यक्ष कैलास सदाफळ आदी उपस्थित होते.
दहा वर्षांत शिवाजीमहाराजांचा पुतळा अरबी समुद्रात झाला नाही, महाराजांच्या नावावर आता किती दिवस राजकारण करणार असा प्रश्न करून संभाजीराजे म्हणाले, की सरकारला पुतळय़ासाठी अरबी समुद्रातील जागेची अडचण असेल तर ज्या ठिकाणी महाराजांचा अभिषेक झाला त्या ठिकाणी किंवा राज्यातील पाच किल्ल्यांचे संवर्धन केल्यास शिवाजीमहाराजांचे कार्य सर्वाना समजेल. शिवाजीमहाराज व शाहूमहाराज यांनी बहुजन समाजाला एकत्र आणून स्वराज्य निर्माण केले.

परंतु सरकार मात्र मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहे. दुसऱ्या समाजाचे आरक्षण काढून आम्हाला देऊ नका, मराठा समाजाला आरक्षणासाठी सरकारने प्रयत्न न केल्यास आगामी निवडणुकांमध्ये याचे वेगळे चित्र दिसेल. राज्य सरकाने सर्वाना मोफत व सक्तीचे शिक्षण दिले पाहिजे. सरकार मात्र दिवसेंदिवस शिक्षणावरचा खर्च कमी करीत आहे. आरक्षणाच्या मुद्यावरून समाजाने कायदा हातात घेतला तर याला आपण जबाबदार राहणार नाही, असे त्यांनी सांगितले.
प्रवीण गायकवाड म्हणाले, सर्व नेत्यांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे तरीही आरक्षण का मिळत नाही, त्यामुळे आरक्षण मिळविण्यासाठी राज्यात दबाव गट निर्माण करण्याचे काम आम्ही करत आहोत. दशरथ गव्हाणे यांनी स्वागत व प्रस्तावित केले. जिल्हाध्यक्ष प्रवीण कानवडे यांनी मराठा आरक्षणाची भूमिका विशद केली. या वेळी खा. वाकचौरे, म्हस्के, सदाफळ, कुंजीर, अभय शेळके, कमलाकर कोते यांची भाषणे झाली.