दरवर्षी पावसाळ्यात शरपंजरी पडणाऱ्या डांबरी रस्त्यांमधून ठाणेकरांची मुक्तता व्हावी, यासाठी ठाणे महापालिकेने डांबरऐवजी सीमेंट काँक्रीट आणि यू.टी.डब्लू.टी. पद्धतीने शहरातील २९५ रस्त्यांची कामे हाती घेतली असून त्यापैकी येत्या सहा महिन्यांत ५० टक् के रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. महापालिकेने खड्डेमुक्त प्रवासाच्या दिशेने वाटचाल सुरू केल्यामुळे नव्या वर्षांत ठाणेकरांना खड्डेविरहीत, दर्जेदार, दीर्घकाळ टिकणारे रस्ते मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ठाणे महापालिकेच्या हद्दीत एकूण ३५६.४० कि.मी लांबीच्या रस्त्यांचे जाळे विस्तारले असून त्यापैकी ७५.०३ कि.मी लांबीच्या रस्ते सीमेंट काँक्रीट आणि यू.टी.डब्लू.टी. पद्धतीने पूर्ण करण्यात आले आहेत. तसेच ३४.३८ कि.मी लांबीच्या रस्त्यांचे कामही यू.टी.डब्लू.टी. पद्धतीने करण्यात येणार असून त्यासंबंधीची प्रक्रिया महापालिका स्तरावर सुरू आहे. उर्वरित २४७ कि.मी लांबीचे रस्ते डांबरी स्वरूपात आहेत. ठाणे शहराच्या भौगोलिक स्थितीनुसार, एका बाजूस डोंगर आणि एका बाजूस खाडी असल्याने येथील जमीन क्षारयुक्त आहे. तसेच भूमिगत पाण्याची पातळी जमिनीपासून जवळच आहे. त्यामुळे येथील डांबरी रस्ते दीर्घकाळ टिकत नाहीत, असे महापालिकेच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. डांबरी रस्त्यांचे आयुष्यमान कमी असल्यामुळे दर दोन वर्षांनी या रस्त्यांचे पुनर्पृष्ठीकरण करावे लागते. पावसाळ्यात दरवर्षी या रस्त्यांवर खड्डे पडतात. या रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीचा खर्चही जास्त असतो. खड्डय़ांमुळे अपघात आणि नागरिकांची गैरसोय होते. त्यामुळे महापालिकेने शहरातील डांबरी रस्ते सीमेंट काँक्रीट आणि यू.टी.डब्लू.टी. पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला असून त्यास सर्वसाधारण सभेनेही नुकतीच मान्यता दिली आहे. या कामांच्या निविदा प्रक्रियेसही महापालिकेने सुरुवात केल्यामुळे ठाणेकरांना खड्डेमुक्त रस्ते मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या संदर्भात, महापालिकेचे उपायुक्त तथा माहिती व जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी यांच्याशी संपर्क साधला असता, सीमेंट काँक्रीटीकरण तसेच यू.टी.डब्लू.टी. पद्धतीने रस्ते तयार करण्यासंबंधीच्या निविदा प्रक्रियेस सुरुवात झाली असून वाहतूक शाखेची परवानगी घेऊन रस्त्यांची कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार आहेत. या प्रस्तावातील ५० टक् के रस्त्यांची कामे येत्या सहा महिन्यांत म्हणजेच मे २०१४ अखेपर्यंत पूर्ण होऊ शकतील, असे त्यांनी सांगितले.
आयुष्यमान कालावधी जास्त..
डांबरी रस्त्याच्या प्रतिचौरस मीटरसाठी अंदाजे २११५ रुपये खर्च येतो आणि त्याचा दोषदायित्व कालावधी तीन वर्षे असतो. तसेच या रस्त्याचे आयुष्यमान तीन वर्षे असते. त्याउलट यू.टी.डब्लू.टी. पद्धतीच्या रस्त्याच्या प्रतिचौरस मीटरसाठी अंदाजे ३६१४ रुपये खर्च येतो आणि त्याचा दोषदायित्व कालावधी पाच वर्षे असतो. या रस्त्यांचे आयुष्यमान १० वर्षे असले तरी ते २० वर्षे टिकू शकतात. सीमेंट काँक्रीटीकरण रस्त्याच्या प्रतिचौरस मीटरकरिता अंदाजे ६ हजार ७०० रुपये खर्च येतो. त्याचा दोषदायित्व कालावधी पाच वर्षे असतो. या रस्त्याचे आयुष्यमान २५ ते ३० वर्षे असते. असे असले तरी, आयुष्यमान ५० वर्षांपर्यंत असू शकतो. डांबरी रस्त्यांकरिता खर्च कमी लागत असला तरी, त्याचे आयुष्यमान कमी आहे. त्यामुळे त्याच्या देखभाल दुरुस्तीवर जास्त खर्च होतो. मात्र सीमेंट काँक्रीटीकरण आणि यू.टी.डब्लू.टी. पद्धतीच्या रस्त्यांसाठी जादा पैसे खर्च होत असले तरी, त्याचे आयुष्यमान जास्त आहे. त्यामुळे महापालिकेने अशा प्रकारचे रस्ते तयार करण्याची योजना हाती घेतली आहे, असे महापालिका सूत्रांनी सांगितले.
ठाणे महापालिका हद्दीतील २९५ रस्ते सीमेंट काँक्रीट आणि यू.टी.डब्लू.टी. पद्धतीने करण्यात येणार असून त्याची लांबी १०४.७९४ कि.मी लांबी इतकी आहे. या रस्त्यांची ‘अ’ आणि ‘ब’ अशा प्रकारे यादी करण्यात आली असून त्यांचे येत्या तीन वर्षांत टप्प्याने काम पूर्ण करण्यात येणार आहे. हा प्रकल्प डिफर्ड पेमेंट पद्धतीनुसार राबविण्यात येणार असून त्यासाठी ९७०.३५ कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. त्यामध्ये या रस्त्यांच्या बांधकामानंतर पुढील पाच वर्षांसाठी होणारा देखभाल दुरुस्तीच्या खर्चाचाही समावेश आहे.

Story img Loader