शिर्डीतील भिका-यांच्या हत्याप्रकरणी सीरियल किलरचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके नेमली, परंतु त्याचा शोध घेण्यास यश न आल्याने पोलिसांच्या एकूणच कार्यपद्धतीविषयी नागरिकांनी संशय व्यक्त केला आहे.
येथील रेल्वेस्थानकावर दोन भिका-यांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्यानंतर १५ दिवसांतच पुन्हा चार भिका-यांची हत्या करण्यात आली. या प्रकाराने शिर्डीत खळबळ उडाली व पोलिसही चक्रावून गेले. सहा भिका-यांच्या हत्याकांडाचे प्रकरण गंभीर असताना सुरुवातीला या प्रकरणाचा तपास शिर्डीचे पोलिस निरीक्षक दत्ता पवार यांच्याकडे देण्यात आला. परंतु पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या भिका-यांपैकी एका भिका-याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. पोलिसांनी सदर प्रकरण आपल्या अंगलट येऊ नये म्हणून असे काही घडलेच नाही असे म्हणत हात वर केले. त्यानंतर या हत्याकांडाचा तपास शिर्डीचे पोलिस उपाधीक्षक विवेक पाटील यांच्याकडे देण्यात आला. परंतु त्यांनाही या प्रकरणाचा तपास लावण्यात स्वारस्य नसल्याचेच त्यांच्या वक्तव्यावरून दिसून येते. तपासाबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता तपास चालू आहे, तूर्त काहीही माहिती देवू शकत नाही असे सांगितले.
शिर्डीमध्ये मोठय़ा प्रमाणात फौजफाटा असतानाही गुन्हेगारीचा आलेख सातत्याने वाढता आहे. वरिष्ठ पोलिस अधिका-यांचे शिर्डीत वाढत्या गुन्हेगारीकडे दुर्लक्ष असल्याने विविध घटनांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ होत आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुनीता साळुंके-ठाकरे यांनीही अनेक वेळा शिर्डीतील गुन्हेगारी कमी करण्यासाठी जाहीर वाच्यता केली. परंतु त्यांनाही शिर्डीतील गुन्हेगारी रोखण्यात अपयश येत आहे.

Story img Loader