अमरावती शहरातील रहिवाशांसाठी पुरेशा प्रमाणात वैयक्तिक आणि सामूहिक स्वच्छतागृहांच्या उभारणीला अजूनही गती न आल्याने शहरातील अनेक भागात हागणदारी तयार झाल्या असून हमरस्त्यावरील फूटपाथचाही सर्रास वापर होत असल्याने आरोग्यविषयक प्रश्न निर्माण झाले आहेत.
झोपडपट्टय़ांमध्ये स्वच्छतागृहे नसल्याने हजारो नागरिकांना उघडय़ावर शौचास जाणे भाग पडत आहे. शहरातील ३२ ठिकाणी अशा हागणदारी तयार झाल्या आहेत, व्यावसायिक संकुलांच्या उभारणीत अधिक रस दाखवणाऱ्या महापालिकेने स्वच्छतेच्या या गंभीर प्रश्नाकडे अनेक वर्षांपासून दुर्लक्ष चालवल्याचे दिसून आले आहे.
अमरावती शहरातील १ लाख ३७ हजार कुटुंबांपैकी सुमारे १५ हजार ३८५ कुटुंबांकडे वैयक्तिक स्वच्छतागृहे नाहीत. वैयक्तिक स्वच्छतागृहांव्यतिरिक्त अमरावती महापालिकेने गेल्या काही वर्षांमध्ये गरिबांसाठी सार्वजनिक किंवा सामूहिक स्वच्छतागृहांची सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. याशिवाय रमाई आवास योजना, अनुसूचित जातींसाठी वैयक्तिक स्वच्छतागृहे , महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवी नागरी दलितवस्ती पाणीपुरवठा व स्वच्छता योजा अशा योजना देखील राबवण्यात येत आहेत. मात्र, या उपाययोजना राबवून देखील शहरातील झोपडपट्टय़ांमध्ये खुल्यावर शौचास जाणे हे सामान्य झाले आहे. उघडय़ावर शौचाचा लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.
अंदाजे ४४ हजार ३०० कुटुंबे सामूहिक स्वच्छतागृह सेवेचा उपयोग करतात. शहरातील ५ प्रभागांमध्ये २५ सुलभ शौचालये आहेत. अमरावती शहरातील सुमारे ५ ते ६ टक्के कुटुंबांकडे वैयक्तिक स्वच्छतागृहे किंवा सामूहिक स्वच्छतागृहांचा अभाव असल्याने त्यांचा उघडय़ावर जावे लागते. अंदाजे १६ हजार १२८ कुटुंबांकडे कोणत्याही प्रकारची स्वच्छतागृहांची सुविधा नसल्याने त्यांचा उघडय़ावर शौचास जाण्याशिवाय पर्याय नाही.
अमरावती शहरात शौचालयांची ही अवस्था असताना मुत्रीघरांचा प्रश्न देखील जटील बनलेला आहे. एस.टी बसस्थानक, रेल्वेस्थानकांच्या जवळ तसेच गर्दीच्या ठिकाणी मुत्रीघरे असावीत ही साधारण अपेक्षा देखील पूर्ण करण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांची त्यामुळे मोठी गैरसोय होत आहे. अमरावती शहरातील व्यापारी संकुलांमध्ये देखील मुत्रीघरांची सुविधा नाही. घराबाहेर पडलेल्या व्यक्तीसाठी बाजारपेठ किंवा मुख्य रस्त्यांच्या कडेला मुत्रीघरांची सोयच नाही. त्यासाठी महापालिकेकडे कोणतेही धोरण नाही. शहरात ५० मुत्रीघरे आणि ८० सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्याचा प्रस्ताव ‘सिटी सॅनिटेशन प्लान’मध्ये आहे, पण तोही अजूनपर्यंत कागदावर आहे. याशिवाय शहरात ४८० कम्युनिटी टॉयलेट उभारण्याचा प्रस्ताव हा स्वप्नच ठरण्याची शक्यता आहे. शहरात जागोजागी झालेल्या हागणदारींमुळे आरोग्यविषयक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. साथीचे आजार फैलावण्याचा धोका आहे.
मलनित्सारण व्यवस्थाच नसल्याने अनेक भागात धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. लोकांना उघडय़ावर शौचास जाण्याशिवाय पर्याय नसल्याने इतर लोकांनाही या हागणदारींमधून नाकाला रुमाल लावूनच वाट काढणे भाग पडत आहे. नागरिकांची यासंदर्भात सातत्याने ओरड सुरू असतानाही महापालिकेचे मात्र त्याकडे दुर्लक्ष आहे.
स्वच्छतागृहांअभावी अमरावतीचे विद्रुपीकरण!
अमरावती शहरातील रहिवाशांसाठी पुरेशा प्रमाणात वैयक्तिक आणि सामूहिक स्वच्छतागृहांच्या उभारणीला अजूनही गती न आल्याने शहरातील अनेक भागात
First published on: 14-04-2015 at 07:14 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No public toilet facility in amravati