वांद्रे टर्मिनस येथे अलिकडेच प्रीती राठी या तरूणीवर झालेल्या अॅसिड हल्ल्यानंतर वांद्रे टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथील सुरक्षा व्यवस्थेबाबत चर्चा सुरू झाली आहे, आणि अनेक प्रश्नही उभे राहिले आहेत. वांद्रे टर्मिनस असो वा लोकमान्य टिळक टर्मिनस! तुम्हाला या टर्मिनसवर जाण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट काढण्याची आवश्यकता नाही. कोणत्याही बाजूने तुम्ही या टर्मिनसवर जाऊ शकता आणि परत बाहेर येऊही शकता. सर्व बाजूने उघडे असलेले ही टर्मिनस म्हणजे ‘आव जाव, घर तुम्हारा’ अशा अवस्थेतील आहे. सुरक्षेची पार ऐशी तैशी करणारी ही दोन टर्मिनस म्हणजे मुक्त संचाराची ठिकाणे आहेत. या परिसरात फक्त प्रवाशांचीच गर्दी असते असेही नाही. आसपासच्या मोकळ्या जागांवर अनधिकृतपणे राहणारे अनेकजण आपल्या हक्काची विश्रांतीची किंवा विरंगुळ्याची जागा म्हणून या परिसरात वावरताना दिसतात. त्यांना हटकण्याची हिंमत प्रवासी करूच शकत नाहीत, अशी स्थिती आहे.
मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील टिळकनगर रेल्वे स्थानकाच्या जवळ असलेले लोकमान्य टिळक टर्मिनस म्हणजे सर्वांसाठीच मुक्त द्वार आहे. एखादी दुचाकी सहजपणे थेट फलाटावर जाऊ शकते. जुने टर्मिनस आणि नवे टर्मिनस असे या टर्मिनसचे दोन भाग झाले आहेत. कुर्ला रेल्वे स्थानकाच्या दिशेने असलेल्या बाजूला जुने टर्मिनस तर विद्याविहारच्या दिशेने नवे टर्मिनस आहे. येथे इलिकडेच रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालेली वास्तू असून तेथे सुरक्षा पहारा चांगला असला तरी अवस्था सारखीच आहे. कोणीही कोणत्याही बाजूने आतमध्ये प्रवेश करू शकतो आणि पुन्हा बाहेर निघून जाऊ शकतो. रिक्षा-टॅक्सीचालक बिनदिक्कत आतमध्ये येऊन प्रवाशांना अक्षरश: खेचून बाहेर नेऊ शकतात तर विरोध करणाऱ्याला मारहाणही केली जाऊ शकते.
याच स्थानकावर रात्री उशीरा किंवा भल्या पहाटे बाहेरगावाहून येणाऱ्या नवख्या प्रवाशांना बाजूच्या टिळकनगर उपनगरी स्थानकापर्यंत रस्ता दाखवून पैसे उकळणाऱ्यांचा धंदा तेजीत चालतो. पहाटे तिकिट खिडकी उघडताच लांबलचक रांगा सुरू होतात. आपल्याला हव्या असलेल्या उपनगरी रेल्वेगाडय़ा डोळ्यादेखत येजा करत असतात पण तिकिटांची रांग मात्र मुंगीच्या पावलाने पुढे सरकत असते. अचानक कोपऱ्यात सीव्हीएम कूपन विक्री सुरू असल्याची आवई उठते आणि रांगा विस्कटून जातात. प्रवासी त्या कोपऱ्यात धाव घेतात. ही कूपन विक्री अधिकृत नसते. एक टोळके तिकिटाच्या नियमित दरापेक्षा काही पैसे जादा घेऊन आपल्याजवळील कूपन पुस्तिकेतील कूपन्स विकताना दिसते. रांगेतून खिडकीजवळ पोहोचण्याच्या प्रतीक्षेने कंटाळलेले आणि प्रवासाने पेंगुळलेले प्रवासी नाईलाजाने जादा दराने कूपन विकत घेतात आणि गाडी पकडण्यासाठी धाव घेतात. इमाने इतबारे रांगेत उभे राहणारे प्रवासी पश्चात्ताप झाल्यासारखे पुढे सरकत राहतात..
काही महिन्यांपूर्वी वांद्रे टर्मिनसला लागून असलेल्या मोकळ्या भूखंडावर काश्मीरमधून आलेली काही कुटुंबे राहिली होती आणि या कुटुंबानी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह यांची व्यवस्था वांद्रे टर्मिनसवरील एका फलाटावरून केली होती. अर्थात या फलाटावर जाण्यासाठी त्यांना थेट मार्ग होता. त्यांना कोणचाही आणि कोणताही अटकाव नव्हता. येथे बाहेरगावाहून आलेले पार्सल्सचे गठ्ठे पडलेले असतात. फलाटांवर जाण्यासाठी पादचारी पूल आहे पण सुरक्षा- रेल्वे पोलिसांची किंवा रेल्वे सुरक्षा दलाची- कुठेही नसते. वांद्रे रेल्वे स्थानकाच्या दिशेने मुक्त संचाराची सोय असलेल्या या स्थानकावर सीसीटीव्ही असले तरी त्यांचा विशेष उपयोग होत नाही. खारच्या बाजूला बंदिस्त असलेल्या या टर्मिनसवर रिक्षाचालकांचाही संचार असून ते प्रवाशांना सहज सामानासह आपल्या गाडीपर्यंत खेचून नेऊ शकतात.
‘आव जाव घर तुम्हारा’!
वांद्रे टर्मिनस येथे अलिकडेच प्रीती राठी या तरूणीवर झालेल्या अॅसिड हल्ल्यानंतर वांद्रे टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथील सुरक्षा व्यवस्थेबाबत चर्चा सुरू झाली आहे, आणि अनेक प्रश्नही उभे राहिले आहेत.
First published on: 11-05-2013 at 12:22 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No railway security on bandra terminus and lokmanya tilak terminus