दुपारच्या वेळी अनेक स्टार बसेसमधील आसने बऱ्यापैकी रिकामी असतात. कारण, प्रवासी एकतर बसच्या दाराजवळ उभे असतात किंवा हवेची झुळुक अंगावर घेण्यासाठी धडपडताना दिसतात. कारण, कोणालाही आतमध्ये बसून भाजून निघायचे नसते.. शहरातील विविध भागातील नेहमीचे रिक्षा स्टँडवर एखाद-दुसरा रिक्षाचालक झाडाच्या सावलीत बसलेला दिसतो. वाढत्या उन्हात बसची प्रतीक्षा करणाऱ्यांची संख्यादेखील आता कमी झालेली आहे.. एरवी दुपारच्यावेळी खरेदीसाठी फिरणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. ठोक व्यापारांची प्रतिष्ठाने बंद असली तरी काही चिल्लर व्यापारी दुकाने सुरू ठेवून उन्हात बाहेर न पडता कुलर किंवा पंख्याची हवा घेत गिऱ्हाईकांची वाट पाहताना दिसतात.. शहरातील रस्ते दुपारी ओसाड पडलेले जे फिरत आहे ते डोक्याला दुपट्टा बांधून दिसत आहे. ताक, ज्यूस, लिंबू शरबत, उसाचा रस, लस्सी अशा ठंडा ठंडा कुल कुल स्टॉल्सचा धंदा जोरात चालला आहे. गिऱ््हाईकांना थंडावा देता देता विक्रेते आपली तहान आपल्या शीतपेयांनी शमवत आहेत..ही सारी शहरातील विविध भागातील यंदाच्या उन्हाळ्याची चित्रे आहे.
गेल्या आठ ते दहा दिवसांपासून शहरातील तापमानात वाढ होत असताना सगळीकडे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तापमान वाढत असताना उकाडय़ाची दाहकता जास्त वाढली असून विदर्भातील सर्वच जिल्ह्य़ाच्या ठिकाणचे तापमान सरासरीच्या पार गेले आहे. दुपारच्या तापमानाने तर नागपूर, चंद्रपूर, अकोला, वर्धा, ब्रम्हपुरी या ठिकाणी ४४- ४५ अंश सेल्सियचा टप्पा ओलांडलेला आहे. नागपुरात गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला जणू काही सूर्य कोपला की काय असेच वाटत आहे. सकाळी दहानंतर उन्हाचा तडाखा बघता दहाच्या आत अनेक ज्येष्ठ नागरिक आपली कामे आटोपून घरी परतत आहेत. सरकारी व खाजगी कार्यालयात जाणारी चाकरमानी मंडळी सकाळी घरून निघताना स्कार्फ बांधून आणि एखादा कांदा जवळ ठेवून निघतात. एरवी दर एक तासानी सरकारी व खाजगी कार्यालयाच्या बाहेर चहासाठी किंवा मित्रांसोबत गप्पा मारण्यासाठी बाहेर पडणारे कर्मचारी व अधिकारी दुपारी १२ ते ५ च्या सुमारास चहाच्या टपरीवर दिसत नाहीत. आकाशवाणी चौक किंवा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नेहमी दिसणारी वर्दळ दुपारच्यावेळी दिसत नाही.
अनेक कार्यालयात नेहमीचा ठरलेला चहावालाच कर्मचाऱ्यांना चहा नेऊन देत असल्याचे चित्र बघायला मिळाले. सिव्हील लाईन भागातील महापालिका परिसरातील ताक विक्रेत्याकडे दुपारच्यावेळी ताकचा आस्वाद घेणारी मंडळी फारशी दिसून येत नाही.
अचानक वाढलेल्या तापमानामुळे नागपूरकर मेटाकुटीला आला आहे. येणाऱ्या दिवसात उकाडा वाढेल का अशी विचारणा केली असता त्याबद्दल आताच भाकित करता येणार नसल्याचे वेधशाळेकडून सांगण्यात आले. त्यातच शहरात आणि ग्रामीण भागातील काही भागात ऐन उन्हाळ्यात वीज जाण्याचे प्रमाण सुरू आहे त्यामुळे नागरिक या उकाडय़ामुळे त्रस्त झाले आहे. सध्याची हवामानाची स्थिती पाहता उकाडय़ात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांना या उन्हाच्या तडाख्यापासून सध्या तरी दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत नाही.
दिलासा नाहीच.. उन्हामुळे काहिली..
दुपारच्या वेळी अनेक स्टार बसेसमधील आसने बऱ्यापैकी रिकामी असतात. कारण, प्रवासी एकतर बसच्या दाराजवळ उभे असतात किंवा हवेची झुळुक अंगावर घेण्यासाठी धडपडताना दिसतात. कारण, कोणालाही आतमध्ये बसून भाजून निघायचे नसते..
First published on: 03-05-2013 at 11:42 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No relief heat due to sun shine