मराठवाडा कृषी विद्यापीठाचे नामांतर नको नामविस्तार हवा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली.
वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कारप्राप्त अजित उत्तमराव मगर यांच्यासह डॉ. विलास मुंढे, चंद्रशेखर शिंदे, डॉ. प्रशांत भोसले आदींनी मुख्यमंत्र्यांना हे निवेदन पाठवले आहे. त्यात मराठवाडा कृषी विद्यापीठाचे नामांतर केल्यास मराठवाडय़ाच्या अस्मितेचा प्रश्न उभा राहू शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे. राज्य सरकारने मराठवाडा कृषी विद्यापीठाला वसंतराव नाईक नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पाश्र्वभूमीवर ही मागणी आता पुढे आली आहे.
हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांचे नाव विद्यापीठाला मिळणे ही बाब निश्चितच भूषणावह आहे. तथापि विद्यापीठाचा नामविस्तार हा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ असा करण्यात यावा. सरकारने कोकण विद्यापीठाचा नामविस्तार करतानाही बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ असा केला आहे. स्थानिक अस्मिता जपणे हा या मागचा उद्देश आहे. मराठवाडा महाराष्ट्रात विनाअट सामील झाला. मात्र, मराठवाडय़ाची अस्मिता या पद्धतीने निकाली काढली जाऊ नये, असे निवेदनात म्हटले आहे. मराठवाडय़ातील शेतकरी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी या सर्वाच्या भावना लक्षात घेता मकृविचे नामांतर नको तर नामविस्तार करण्यात यावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.