नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवेच्या व्होल्वो बसेसमध्ये सर्वसाधारण बसमध्ये नियमानुसार महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्तींकरिता आरक्षण नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. गर्दीच्यावेळी आरक्षित आसने नसल्याने विशेषत: ज्येष्ठांना आणि अपगांना अधिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे व्होल्वो बसमध्ये नियमानुसार आरक्षित आसने ठेवण्यात यावीत अशी मागणी होत आहे.
महिला, अपंग, ज्येष्ठ नागरिकांसाठी काही व्होल्वो बसेसमध्ये राखीव जागांचे फलक न लावल्याने महिला व ज्येष्ठ नागरिकांना ताटकळत उभे राहून प्रवास करावा लागत आहे. याचा त्रास एनएमएमटीच्या बसमधून प्रवास करताना एका गर्भवती महिलेला आला. दादर ते वाशी बसमध्ये प्रवास करत असताना महिलांसाठी राखीव जागा नसल्याने त्या महिलेला प्रवास करत असताना बसच्या वाहकाला नियमाची आठवण करून देत आसन मिळवून देण्यासाठी विनंती करावी लागली. यामुळे व्होल्वो बसमध्ये नियमानुसार आरक्षित आसनासंदर्भात सूचना देणारे फलक लावण्यात यावे, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात नवी मुंबई परिवहन प्रशासन आधिकारी चंद्रशेखर खामकर यांच्याशी संपर्क साधला असता, परिवहनच्या साध्या व व्होल्वो बसेसमध्ये महिला, अपंग आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी असणाऱ्या राखीव जागेवर त्वरित आरक्षण सूचना लिहिण्याचे सांगण्यात येईल असे त्यांनी सांगितले.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा