टंचाईग्रस्त सोलापूरसाठी आलमट्टी धरणातून दोन टीएमसी पाणी देण्याबाबत कर्नाटक सरकारकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे यातून सकारात्मक मार्ग निघेल, असे दिसत नसल्याने या प्रश्नावर केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे लक्ष घालतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे स्पष्ट केले.
रविवारी सकाळी अजित पवार हे सोलापूर जिल्हय़ातील दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्यासाठी आले होते. आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत त्यांनी सोलापूरसाठी आलमट्टी धरणातून दोन टीएमसी पाणी मिळण्यासाठी उच्च स्तरावरून प्रयत्न केले जात असले तरी त्यास कर्नाटक सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. आलमट्टी धरणातून सोलापूरला दोन टीएमसी पाणी आणून त्या मोबदल्यात तेवढेच पाणी दूधगंगा प्रकल्पातून आलमट्टीला देण्याची राज्य शासनाची भूमिका आहे. नव्हे तर प्रसंगी आलमट्टीचे पाणी खरेदी करण्याची आपली तयारी असल्याचे अजित पवार यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. सोलापूर जिल्हय़ात भीषण पाणीटंचाई आहे. उजनी धरणातील पाणीसाठय़ाचे नियोजन विस्कळीत आहे. चुकीच्या नियोजनामुळे उजनी धरणातील पाणीसाठा खालावला आहे. त्यामुळे उजनी धरणात पुणे जिल्हय़ातून पाणी सोडण्याची मागणी उठाव धरत होती. परंतु पुण्यातील कोणत्याच धरणातून पाणी सोडता येणार नाही. त्याऐवजी आलमट्टी धरणातून सोलापूरसाठी पाणी मिळवून देता येईल, अशी भूमिका पवार यांनी गेल्या २१ डिसेंबर रोजी नागपूर येथे राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या काळात सोलापूरच्या लोकप्रतिनिधींच्या बैठकीत मांडली होती. त्यास दोन महिन्यांचा कालावधी होत असताना सोलापूरला आलमट्टी धरणातून पाणी अद्याप मिळाले नाही.
दरम्यान, आलमट्टीचे दोन टीएमसी पाणी मिळण्यासाठी सोलापूरचे पालकमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बंगळुरू येथे कर्नाटकचे मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांची भेट घेतली होती. या वेळी दूधगंगा धरणातून कृष्णा नदीवाटे कर्नाटकाला पाणी देणे आणि आलमट्टी धरणातून भीमा नदीवाटे सोलापूरला पाणी घेण्याबाबत चर्चा झाली होती. यासंदर्भात कर्नाटक शासनाचे शिष्टमंडळ येत्या आठवडय़ात सोलापूरला भेट देणार असून त्यानंतर पुढील चर्चेची तारीख निश्चित होणार होती. परंतु आता कर्नाटक शासनाकडून आलमट्टीचे पाणी सोलापूरसाठी सोडण्याची तयारी दिसत नसल्याचे पवार यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सोलापूरला पुणे जिल्हय़ातूनही पाणी मिळत नाही आणि आता आलमट्टी धरणातूनही पाणी मिळण्याची शक्यता नसल्यामुळे पाण्याच्या बाबतीत ‘दोन्ही घरचा पाहुणा उपाशी’ अशी केविलवाणी स्थिती सोलापूरची झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा