लातूर शहरातील पाणीपुरवठा योजना चालवण्याचाच अधिकार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला आहे. पाणीदरात वाढ करणे अथवा मीटर बसवणे, असे अधिकाराच्या बाहेर जाऊन प्राधिकरण काम करणार असेल, तर खासगीकरणविरोधी संघर्ष समिती गप्प बसणार नाही, असा इशारा अॅड. उदय गवारे यांनी दिला.
समितीच्या वतीने जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता एस. जी. कलिके यांना निवेदन देण्यात आले. लातूर महापालिका, जीवन प्राधिकरण व खासगी कंपनी यांच्यात झालेला त्रिपक्षीय करार सुरुवातीला रद्द करावा, खासगी कंपनीने आपला बोराबिस्तरा केव्हाच गुंडाळला. त्रिपक्षीय करार मृतावस्थेत ठेवून आज ना उद्या तो जनतेच्या माथी मारण्याचा जीवन प्राधिकरणाचा हेतू असल्याचा आरोपही गवारे यांनी केला.
लातूर शहराला आठवडय़ातून एकदाच कसेबसे पाणी दिले जाते. मात्र, जीवन प्राधिकरण त्यासाठी मनमानी दरवाढ करते. यापुढील काळात पाणीदरात वाढ करण्याचा, तसेच नळाला मीटर बसविण्याचा बेकायदा प्रयत्न केल्यास खासगीकरण विरोधी संघर्ष समितीतर्फे पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता एस. जी. कलिके यांना भेटलेल्या शिष्टमंडळात अॅड. मनोहरराव गोमारे, अशोक गोिवदपूरकर, उदय गवारे, सुधीर धुत्तेकर, प्रदीप खंडापूरकर, त्र्यंबक स्वामी आदी सहभागी होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा