जिल्हय़ाच्या पाणीप्रश्नावर एकत्र बसण्याची भूमिका न घेणा-या दोन्ही मंत्र्यांना जिल्ह्याच्या पाणीप्रश्नाचे गांभीर्य नाही, असा आरोप कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना केला.
पाणीप्रश्नाबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना विखे म्हणाले, की पाणीप्रश्नावर तालुक्या तालुक्यात निर्माण झालेला संघर्ष हा जिल्ह्याच्या दृष्टीने हिताचा नाही. यापूर्वीच सर्वानी एकत्र येण्याची गरज होती. पाणीप्रश्नाचे नेतृत्व कोणीही करावे, आम्ही त्यांना खंबीरपणे साथ देऊ. अतिरिक्त पाणी जिल्ह्यात निर्माण होण्यासाठी यापूर्वीच प्रयत्न होणे महत्त्वाचे होते. कोकणातील पाणी वळविण्यास उशीर झाल्याने त्या पाण्याला आता फाटा फुटला. हक्काचे पाणी मिळणे शेतक-यांना अवघड झाले. त्यामुळे मोठे नुकसान होत आहे.
नाशिक व नगर जिल्ह्यातील मंत्री पाणीप्रश्नावर मौन बाळगून आहेत. त्यावर आपणच बोलत असल्याने जाणीवपूर्वक काही लोकांनी मला टार्गेट करून माझ्या विरोधात प्रक्षोभ कसा निर्माण होईल, असा कुटिल डाव रचला आहे. आपल्या नेत्याला खूश करण्यासाठी आपल्याच भागातील काही लोकांचा हा प्रयत्न असून इंडिया बुल्सला पाणी देण्याच्या प्रश्नावरून माझा राजीनामा मागणा-यांनी आधी इंडिया बुल्सला तत्कालीन जलसंपदामंत्री आणि तत्कालीन कृषिमंत्री यांनी पाणी देण्यास मंजुरी दिली त्यांच्या राजीनाम्याची मागणी ते का करत नाहीत, असा सवालही विखे यांनी केला. पाण्याचा प्रश्न हा केवळ राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर या तालुक्यांचा नाही. जिल्ह्यातील शेतक-यांचा आहे. तरीही जिल्ह्यातील मंत्री शेतक-यांच्या प्रश्नावर स्पष्ट भूमिका घेण्याचे टाळतात, असा थेट आरोप मंत्री पिचड व थोरात यांचे नाव न घेता विखे यांनी केला.
जलसंपदा विभागाचा अभ्यास वास्तवास धरून होत नसल्याने त्याचा फटका शेतक-यांना बसत आहे. जिल्ह्यातील पाणीप्रश्नाचे गाभीर्य जिल्ह्यतील एकही मंत्री राज्यामील नेतृत्वाच्या निदर्शनास आणून देण्याऐवजी माझ्यावर टीका करण्यातच त्यांनी धन्यता माानली. नगर दक्षिणेत तत्कालीन पालकमत्र्ंयानी जी भूमिका बजावली तीच आता उत्तरेत विद्यमान पालकमंत्री बजावत आहेत असे विखे म्हणाले.
माझ्याविरुद्ध राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार
शिर्डी विधानसभा मतदारसंघात आपल्या विरोधात संभाव्य उमेदवार कोण असेल असा थेट सवाल पत्रकारांनी केला असता मंत्री विखे म्हणाले, की मागील निवडणुकीत माझ्या विरोधात राष्ट्रवादी पुरस्कृत शिवसेनेचा उमेदवार होता. उद्याही असाच प्रयोग माझ्या विरोधात होणार असल्याने या गोष्टीला आपण महत्त्व देत नाही. ज्या पक्षात राहून लोकांचे प्रश्न ज्यांना सोडविता आले नाहीत ते दुस-या पक्षात जाऊन काय करणार, असा प्रश्न करून लोकसभा दक्षिण मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला शिवसेना पुरस्कृत करेल का, तसे झाल्यास त्या वेळेस योग्य भूमिका घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हय़ातील दोन्ही मंत्र्यांना पाणीप्रश्नाचे गांभीर्य नाही
जिल्हय़ाच्या पाणीप्रश्नावर एकत्र बसण्याची भूमिका न घेणा-या दोन्ही मंत्र्यांना जिल्ह्याच्या पाणीप्रश्नाचे गांभीर्य नाही, असा आरोप कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना केला.
First published on: 18-11-2013 at 02:01 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No seriousness about water problem to 2 minister of district