कोणत्याही सरकारी यंत्रणेत एकदा पैसे गेले की ते काढणे कसे मुश्कील होते त्याचा अनुभव आता बेग पटांगणातील टपरी मार्केटसाठी महापालिकेकडे पैसे जमा करणाऱ्या किरकोळ व्यावसायिकांना येत आहे. वर्ष होऊन गेले, टपरी तर नाहीच, पण जमा केलेले पैसेही परत करण्यास मनपा तयार नाही.
मनपातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने मनपाच्या जुन्या इमारतीसमोरच्या बेग पटांगणात टपरी मार्केट सुरू करण्याचे स्वप्न शहरातील टपरी व्यावसायिकांना दाखवले होते. प्रशासनानेही काही विचार न करता त्यासाठीची जाहिरात वगैरे देऊन प्रत्येकी ६० हजार याप्रमाणे पैसे जमा करून घेतले. राष्ट्रवादीला याचे श्रेय मिळते आहे म्हटल्यावर मनपातील त्यावेळचे विरोधक असलेल्या शिवसेनेने दिल्ली दरवाजाजवळच्या विस्थापित गाळेधारकांना या टपरी मार्केटमध्ये सामावून घेतले जावे म्हणून आंदोलन केले.
शहराच्या मध्यवर्ती भागातील जागा, व्यवसायाची पक्की हमी यामुळे शहरातील किरकोळ विक्रेत्यांना त्याचे चांगलेच आकर्षण निर्माण झाले. अनेकांनी कर्ज काढून, काहींनी घरातील आहेत ते दागिने मोडून मनपाकडे ६० हजार रूपये जमा केले. त्यात दिल्ली दरवाजाजवळच्या विस्थापित गाळेधारकांचाही समावेश आहे. १०० पेक्षा अधिक जणांनी मनपाकडे असे पैसे जमा केले आहेत. या नियोजित टपरी मार्केटचे वास्तूविशारदाकडून आरेखन करून झाले, पुण्यातील हाँगकाँग लेनेच्या धर्तीवर मार्केट उभे करणार अशा वल्गना करून झाल्या. प्रत्यक्षात मात्र हे सगळे राजकारण्यांचे हवेतील बुडबुडेच ठरले आहेत. त्यात हातावर पोट असलेल्या किरकोळ व्यावसायिकांचे एकरकमी ६० हजार रूपये विनाकारण अडकून पडले आहेत.
नगरसेवक बाळासाहेब बोराटे, तसेच अन्य अनेकांना मध्यस्थी करून गेले काही महिने हे पैसे परत मिळवण्याचा प्रयत्न ते व्यावसायिक करत आहेत. मात्र मनपाकडून त्यांना दाद मिळेनाशी झाली आहे. पैसे पाहिजेत तर लगेचच परत मिळतील पण मग त्या नियोजित मार्केटमधील नियोजित जागेवर हक्क दाखवता येणार नाही असे या व्यावसायिकांना सांगितले जात आहे. १ हजार रूपये ठेवा व उर्वरित ५९ हजार रूपये परत द्या या त्यांच्या मागणीची दखलच घ्यायला मनपातील कोणी तयार नाही. पुरातत्व खात्याने अलीकडे पुरातन वास्तूच्या १०० मीटर परिघात कोणतेही नवे बांधकाम करायला मनाई केली आहे. या बेग पटांगणांच्या बरोबर समोरच्या बाजूस पुरातत्व खात्याकडे नोंद असलेली एक बरीच जुनी कमान आहे. त्यामुळे आता या जागेवर काहीही करता येणे मनपाला अशक्य आहे. तरीही या व्यावसायिकांचे पैसे परत
करण्याचे मनपाकडून टाळले जात आहे.
बेग पटांगणावर अनेकांचा डोळा
शहरातील या मोक्याच्या जागेवर असणाऱ्या भूखंडावर अनेकांचा डोळा आहे. त्यातच आता काही स्वयंसेवी संस्थांची भर पडली आहे. तसेच पुरातत्व खात्याशी संपर्क साधून त्यांच्या नियमात त्यांना काही बदल करणे भाग पाडण्याच्याही हालचाली सुरू आहेत. त्यामुळेही हा भूखंड चर्चेत आला आहे. गेली अनेक वर्षे या भूखंडाचा काही भाग वाळू व्यावसायिकांनी बळकावला आहे, तर काही भागावर मनपाच्याच स्वच्छता विभागाचे लहान कार्यालय आहे. परिसरातील नागरिकांच्या मते या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या भूखंडावर लहान मुलांसाठी खेळणी असलेली एखादी छोटी बाग तयार करणेच सर्वाधिक योग्य वापर करण्यासारखे आहे. 

Story img Loader