एलबीटी विरोधी संघर्ष समिती आणि नाग विदर्भ चैंबर ऑफ कॉमर्सच्या नेतृत्वाखाली पुकारण्यात आलेल्या व्यापार बंदच्या तिसऱ्या दिवशी उपराजधानीत संमिश्र प्रतिसाद मिळाला. मुख्य बाजारपेठ वगळता किरकोळ व्यावारांची दुकाने मात्र आज सुरू होती. या बेमुदत व्यापार बंदसाठी संघर्ष समितीचे पदाधिकारी छोटय़ा विक्रेत्यावर दबाव आणून प्रतिष्ठाने बंद करीत असल्याचे चित्र शहरातील शहरातील विविध भागात दिसून येत आहे. त्यामुळे एलबीटी विरोधी आंदोलनात घाऊक व्यापारी आणि किरकोळ व्यापारी अशी दुफळी निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान अनेक किरकोळ व्यापारी तहसील पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेले असता काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्था कर लागू केल्यानंतर त्याला विरोध करण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स आणि एलबीटी संघर्ष विरोधी समितीने पुकारलेल्या व्यापार बंदला किरकोळ व्यापारांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांच्यावर दबाव आणला जात असून जबरदस्तीने व्यापारी प्रतिष्ठाने बंद करण्यासाठी समितीचे कार्यकर्ते प्रयत्न करीत आहेत. यात चेंबरच्या अनेक पदाधिकाऱ्यांशी वाद झाल्यामुळे काहीं किरकोळ व्यापारी कोतवाली आणि तहसील पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेले होते. पोलिसांनी आणि चेंबरच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढल्यावर हा वाद निवळला.
तिसऱ्या दिवशी शहरातील मुख्य बाजारपेठ सोडल्या तर शहरातील विविध भागातील किरकोळ व्यापारांची दुकाने सुरू होती. मोमीनपुरा भागात मात्र आज कडोकोट बंद होता. यावेळी तेथील व्यापारांनी पुतळा जाळून सरकारचा निषेध केला. सराफा, धान्य आणि किराणा ओळमध्ये कडेकोट बंद पाळण्यात आला. इतवारी, गांधीबाग, कपडा मार्केट, सराफा ओळ, महाल, केळीबाग, गोकुळेपेठ, सीताबर्डी, मस्कासाथ,लकडगंज, वर्धमाननगर, सदर, बैरामजी टाऊन, प्रतापनगर, कॉटेनमार्केट, पाचपावली, इंदोरा, सक्करदरा, नंदनवन, मानेवाडा या परिसरात चेंबर आणि संघर्ष समितीचे कार्यकर्ते दुकाने बंद करण्याची विनंती करीत होते. चिल्लर किराण व्यापारी संघाने या बंदला पाठिंबा घोषित केला असला तरी शहरातील अनेक दुकाने आज सुरू होती. सीताबर्डी भागातील अनेक प्रतिष्ठाने सकाळच्यावेळी सुरू होती. होलसेल मार्केटच्या समोर व्यापारांनी निदर्शने करीत सरकारचा निषेध केला.
यावेळी चेंबरच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत आंदोलन मागे न घेण्याचे आवाहन करीत सर्व व्यापारी संघटनांनी त्यात सहभागी होण्याची विनंती केली. येत्या २६ एप्रिलला काढण्यात येणाऱ्या व्यापारांच्या मोर्चात मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. बाहेरून आयात करण्यात आलेला माल व्यापारी उचलत नसल्यामुळे तिसऱ्या दिवशी बंदमुळे ७० ते ८० कोटीची आणि गेल्या तीन दिवसात ७०० ते ६०० कोटीची उलाढाल ठप्प झाल्याचा दावा दावा चेंबरच्या पदाधिकाऱ्यांनी केला. बैठकीला चेंबरचे माजी अध्यक्ष रमेश मंत्री आणि विद्यमान अध्यक्ष दीपेन अग्रवाल, व्हीआयएचे अध्यक्ष प्रफुल्लभाई दोशी, मुरलीधर सुरजन, राधेश्याम सारडा, नीलेश सूचक, अजय मदान, हेमंत गांधी, सराफा असोसिएशनचे माजी अध्यक्ष किशोर धाराशिवकर उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा