लहान कारखाने चालविणे अवघड झाले असून, आपल्या कारखान्याएवढय़ा गाळप क्षमतेचे ९० टक्के कारखाने लिलावात निघाले आहेत. सहकारी कारखानदारी टिकवायची असेल, तर साखर उद्योग नियंत्रणमुक्त झाला पाहिजे असे मत माजी आमदार शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले. संचालक आणि सभासदांनी आपल्या कार्यक्षेत्रातील उसाचे कांडेसुद्धा बाहेरच्या कारखान्याला देऊ नये असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले.
लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या ३९ व्या गळीत हंगामाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. सात ज्येष्ठ सभासदांचा सत्कार या वेळी करण्यात आला. कार्यक्रमास कारखान्याचे अध्यक्ष डॉ. दिलीपराव चव्हाण, उपाध्यक्ष अॅड. बाळासाहेब जाधव, माजी अध्यक्ष ज्ञानदेव शिर्के, पाटण पंचायत समितीच्या सभापती वनिता कारंडे, माजी सभापती मुक्ताबाई माळी, शिवसेना तालुकाध्यक्ष जयवंत शेलार, अॅड. डी. पी. जाधव, यशराज देसाई, शिवदौलत बँकेचे अध्यक्ष अॅड. मिलिंद पाटील यांची उपस्थिती होती.
शंभूराज देसाई म्हणाले, की आपण सहकार परिषदेचा अध्यक्ष आणि महाराष्ट्र बँकेच्या संचालक पदावर काम करताना गेली २५ वष्रे आपल्या साखर कारखान्याची जबाबदारी सांभाळल्यामुळे सहकाराचे कामकाज कसे चालते त्याचा जवळून अनुभव घेता आला. त्या अनुभवातून आज आपला कारखाना कर्जमुक्त झाला आहे. इतर कारखान्यांच्या बरोबरीने उत्पादन करीत आहे.
गेली २६ वष्रे मला सभासदांनी साथ दिल्यानेच कारखाना कर्जात जाऊ दिला नाही. लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी सिंचन योजना उभारल्या. त्यामुळे शेतापर्यंत पाणी आले आणि ऊस उत्पादनामुळे तालुक्यातील शेतकरी सभासद सधन झाले. योग्य नियोजन व सभासदांच्या बरोबरीने आपला कारखाना आजही कर्जमुक्त आहे. अन्य नवीन कारखान्यांच्या बरोबरीने हा कारखाना गाळप करीत आहे. एखादी उपसा सिंचन योजना बंदी पडली, की कारखाना पैसे घालून ती सुरू करतो. खते, बी-बियाणे पुरवतो. असे असताना दुसऱ्याच्या कारखान्याला देऊन शेतकरी आपल्याच हाताने स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहेत.
त्यांचे अन्य सभासदांनी प्रबोधन करणे गरजेचे आहे. लोकनेत्यांप्रमाणे आम्हीही शेतकरी आणि कर्मचाऱ्याचे हित जोपासले आहे.
कर्मचाऱ्यांना ६ व्या वेतन आयोगानुसार पगारवाढ, २५ टक्के बोनस दिला आहे. कामगारांनी बांधिलकी म्हणून काम केले पाहिजे. लोकनेत्यांनी रोपटे लावून उद्योग समूह निर्माण केला. त्याचे फळ तुम्हांला मिळत असून, लोकनेत्यांच्या लौकिकास साजेसे काम सगळय़ांनी करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक डॉ. दिलीपराव चव्हाण यांनी केले.
बाहेरच्या कारखान्याला ऊस जाऊ देऊ नका -शंभूराज देसाई
लहान कारखाने चालविणे अवघड झाले असून, आपल्या कारखान्याएवढय़ा गाळप क्षमतेचे ९० टक्के कारखाने लिलावात निघाले आहेत. सहकारी कारखानदारी टिकवायची असेल, तर साखर उद्योग नियंत्रणमुक्त झाला पाहिजे असे मत माजी आमदार शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले.
First published on: 09-11-2012 at 04:45 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No sugar for outsider factory