तळोजा औद्योगिक वसाहतीलगत असणारी १५ गावे, नावडे नोड व पाचनंदनगर या वसाहतींमधील रहिवाशांना सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत वायुप्रदूषण सहन करून जगावे लागते. हवेत हा उग्र दर्प कोण सोडतो, याची विचारणा करणारी कोणती सरकारी यंत्रणा उपलब्ध नसल्याने हे वायुप्रदूषण कमी होण्याऐवजी वाढले असल्याचे चित्र आहे. 

पनवेलच्या जमिनीला सोन्याचा भाव आल्याने ग्रामस्थांचे जिवनमान उंचावले आहे. कोणी लाख तर कोणी कोटी रुपये खर्चून बंगले बांधले आहेत. या बंगल्यांच्या पायऱ्या चढण्यापेक्षा अनेकांनी बंगल्यांमध्ये लिफ्टची सोय केली आहे. या बंगल्यांच्या खाली आपल्याला बीएमडब्ल्यू, ऑडी अशा महागडय़ा आलिशान गाडय़ा लागलेल्या दिसतात. मात्र सायंकाळ झाली की या बंगलेदारांना स्वत:ला बंगल्यामध्ये दारे, खिडक्या बंद करून दुसऱ्या दिवसाची पहाट होण्याची वाट पहावी लागते. येथील ग्रामस्थांकडे जगण्यासाठी समाधानपूवर्क श्रीमंती असली तरीही जगण्यासाठी प्रत्यक्ष मिळणारा प्राणवायू त्यांच्या नशिबी नाही अशी येथील परिस्थिती आहे. स्वत:ची कोंडी करून येथील ग्रामस्थ जगतात. ही कोंडी सुटावी यासाठी येथील लोकप्रतिनीधींनी अनेकदा प्रयत्न केले. मात्र वायुप्रदूषण काही कमी होत नाही हेच सत्य आहे. कारखानदारांना विचारणा केल्यास त्यांच्याकडून हात वर केले जात आहेत. प्रदूषणाच्या नियंत्रणासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने प्रदूषण नियंत्रण मंडळ स्थापन केले आहे. मात्र या मंडळातील अधिकाऱ्यांच्या अपयशामुळे तळोजा परिसरातील ग्रामस्थांना गुदमरवणारा हा वायू नेमका कोण सोडतो याचा तपास लागू शकलेला नाही. तळोजातील या वायुप्रदूषणामुळे तळोजा, नावडे, पेणधर, घोटकॅम्प, घोट, नितळस, वावंजा, देवीचा पाडा, पाले, तोंडरे, वलप, पडघे, देवीचा पाडा, चिंध्रण, ढोंगऱ्याचा पाडा, घोटचाळ ही गावे आणि नावडे, तळोजा पाचनंदनगर, कळंबोली या वसाहतींमधील रहिवाशांना उग्र दर्प सहन करावा लागतो. येथे होणाऱ्या वायुप्रदूषणाची मात्रा किती आहे याची माहिती मिळणारी यंत्रणा येथे बसविण्याची मागणी येथील ग्रामस्थांकडून होत आहे. या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. आजही ढोंगऱ्याचा पाडा व घोट गावालगतच्या कंपन्यांच्या धुरांडय़ातून निघणाऱ्या धुरातून बाहेर पडणारे धुळीचे लहान लहान काळे गर्द वाहनांवर, घरांवर कपडय़ांवर पडतात. तरीही एमपीसीबी प्रशासन ग्रामस्थांना पुरावे कोठे आहे, अशी विचारणा करीत आहे.
तीन वर्षांपूर्वी ढोंगऱ्याच्या पाडा गावात सकाळी पहाटे वायुगळती झाली होती. कोणास काही समझण्याच्या आत येथील रहिवाशांचे डोळे झोंबू लागले, अनेकांना चक्कर येऊन ते जमिनीवर कोसळले, येथील अनेकांनी स्वत:ला खोलीत कोंडून घेतले. तर अनेकजण सैरावैरा पळत सुटले. त्यानंतर सरकारी यंत्रणा जागी झाली. अग्निशमन दलाचे पथक व पोलीस, जिल्हाधिकारी असे विविध अधिकारी घटनास्थळी हजर झाले. वायुगळतीच्या बाधितांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. २३ जणांना ही वायुगळती झाली होती. रफीक नायक या कंपनीतून ही वायुगळती झाली होती. त्या वेळीही प्रशासनाचे बैठकांचे सत्र दिखाव्यापुरती झाले. एमपीसीबीने नेहमीप्रमाणे पाहतो, करतो अशीच भूमिका घेतली. प्रशासनातील अनेक अधिकारी वायुगळतीचा हा धडा विसरले आहेत.
दोन वर्षांपूर्वी औद्योगिक वसाहती शेजारील घोट गावामध्ये २६ जानेवारीला जिल्हा परिषदेच्या विद्यालयाच्या पटांगणात ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी विद्यार्थी व शिक्षक, गावचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते. अचानक ध्वजारोहन करण्याअगोदर वायुगळती झाली. मुलांची पळापळ झाली. शिक्षकांनी वर्गात दारे-खिडक्या लावून स्वत:ला कोंडून घेतले. लोकप्रतिनिधींनी आडोसा पाहून आपला बचाव केला. ध्वजारोहन तसेच राहिले. दोन तासांनी परिस्थिती नियंत्रणात आली. सरकारी सुट्टी असल्यामुळे ही बाब प्रशासनापर्यंत पोहोचली नाही. आजही ही वायुगळती कोणत्या कारखान्यातून झाली याचे ग्रामस्थांना उत्तर मिळाले नाही.

प्रदूषण मोजण्याची यंत्रणा नाही..
जगात कोठेही वायुप्रदूषणाची हवेतील मात्रा मोजण्याचे यंत्र नाही. त्यामुळे तळोजातील वायुप्रदूषण किती आहे, याची हवेतील मात्रा मोजता येऊ शकत नाही. ग्रामस्थांच्या काही तक्रारी असल्यास त्यांनी एमपीसीबीचे अधिकारी तानाजी यादव यांच्याशी किंवा बेलापूर येथील एमपीसीबी कार्यालयाशी संपर्क साधावा. नक्कीच प्रदूषण करणाऱ्या कारखानदारांवर कठोर कारवाई करून बचावात्मक उपाययोजना करता येतील.
यशवंत सोनटक्के,
प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

Story img Loader