होली है.. म्हणत एखाद्याला लाल, निळ्या, हिरव्या, पिवळ्या रंगाच्या पाण्याने नखशिखांत भिजविणे, रंगीत पाण्याने तुडुंब भरलेल्या हौदात बुचकळून काढणे ही धुळवड/रंगपंचमीची परंपरा. परंतु यंदा निम्मा महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असल्याने सामाजिक भान दाखवत रंगपंचमीसाठी टँकरने पाणीपुरवठा करायचा नाही, असा ठाम निर्णय टँकर्स चालक-मालक संघटनांनी घेतला आहे.
होळी आणि रंगपंचमीसाठी अतिरिक्त पाणीपुरवठा करायचा नाही, असा निर्णय महापालिकेने काही वर्षांपूर्वीच घेतला आहे. त्यामुळे इतर दिवसांप्रमाणेच रंगपंचमीच्या दिवशीही पालिकेकडून अन्य दिवसांसारखाच पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परिणामी रंगपंचमी साजरी करण्यासाठी अनेकांनी खासगी टँकरकडे आपला मोर्चा वळविला होता. टँकरच्या पाण्याची फवारणी अंगावर झेलत, संगीताच्या तालावर थिरकणारे पाय, असे दृश्य मुंबईतील अनेक सोसायटय़ांमध्ये पाहायला मिळते. परंतु यंदा मात्र रंगपंचमीसाठी टँकरचे पाणी द्यायचे नाही असा निश्चय टँकर चालक-मालकांनी केला आहे.
महापालिकेकडून पुरविले जाणारे पाणी अपुरे पडत असल्यामुळे अनेक सोसायटय़ांना खासगी टँकरमधून नियमितपणे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच बांधकामांसाठीही टँकरने पाणी उपलब्ध करण्यात येत आहे. त्यामुळे यंदा रंगपंचमीसाठी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार नाही. केवळ नियमित ग्राहकांनाच टँकरने पाणी पुरविले जाईल, असे मुंबई वॉटर सप्लायर या संघटनेचे अध्यक्ष राजेश ठाकूर यांनी स्पष्ट केले.
वाघिणीतून पाणी पाठविण्याचा विचार – महापौर
राज्याच्या दुष्काळग्रस्त जनतेची तहान भागविण्यासाठी मुंबईमधून रेल्वे वाघिणींमधून पाणी पाठविण्याचा विचार सध्या सुरू आहे. याबाबत लवकरच गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल अशी माहिती महापौर सुनील प्रभू यांनी दिली.
टँकरचेही पाणी नाहीच
होली है.. म्हणत एखाद्याला लाल, निळ्या, हिरव्या, पिवळ्या रंगाच्या पाण्याने नखशिखांत भिजविणे, रंगीत पाण्याने तुडुंब भरलेल्या हौदात बुचकळून काढणे ही धुळवड/रंगपंचमीची परंपरा.
First published on: 26-03-2013 at 12:46 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No tanker water to celebrate holi