गेल्या काही वर्षांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. मात्र अनेक महिला उपचार करून घेण्यास पुढे येत नाहीत. त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये ‘नो टच ब्रेस्ट स्कॅन’ यंत्र बसविण्याचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू झाला आहे.
महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण बरेच वाढले आहे. मात्र, लाजेखातर उपचार घेण्यासाठी महिला पुढे येत नसल्याचे आढळून आले आहे. तसेच मॅमोग्राफीद्वारे स्तनांची तपासणी करताना महिलांना वेदना सहन कराव्या लागतात. परिणामी काही महिला उपचार अर्धवट सोडून देतात.
अमेरिकेतील भारतीय वंशाच्या डॉ. शाह यांनी ‘नो टच ब्रेस्ट स्कॅन’ यंत्र तयार केले असून त्याला जागतिक पातळीवर मानांकने मिळाली आहेत. या यंत्रणेद्वारे तपासणी करताना तेथे डॉक्टर अथवा अन्य व्यक्ती नसते. त्यावरील नियंत्रण डॉक्टर दुसऱ्या ठिकाणाहून करतात. त्यामुळे त्यांना रुग्ण महिलेचा चेहरा दिसत नाही. तसेच चाचणीचे अहवालही तात्काळ उपलब्ध होतात. या यंत्राची किंमत सुमारे ८० लाख रुपये आहे. पालिकेची रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये हे यंत्र बसविण्यात आल्यास महिला उपचार करून घेण्यास पुढे येतील, असा विश्वास आरोग्य समितीच्या अध्यक्ष गीता गवळी यांनी व्यक्त केला. याबाबतचा प्रस्ताव लवकरच प्रशासनाला सादर करण्यात येणार आहे. त्याला स्थायी समिती आणि पालिका सभागृहाची मंजुरी मिळताच या मशीन रुग्णालयांमध्ये उपलब्ध होतील, असेही त्या म्हणाल्या. जागतिक कर्कदिनानिमित्त गीता गवळी यांच्या दालनात महापालिका रुग्णालयांच्या अधिष्ठात्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली.
कर्करोगग्रस्त महिलांसाठी पालिका रुग्णालयात ‘नो टच ब्रेस्ट स्कॅन’ मशीन उपलब्ध करण्याचा विचार
गेल्या काही वर्षांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. मात्र अनेक महिला उपचार करून घेण्यास पुढे येत नाहीत. त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये ‘नो टच ब्रेस्ट स्कॅन’ यंत्र बसविण्याचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू झाला आहे.
First published on: 09-11-2012 at 12:19 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No touch breast scan equipment for cancer women