उन्हाळ्यात निर्माण होणारी पाण्याची समस्या टाळण्यासाठी आणि पाणी वितरणाच्या योग्य व्यवस्थापनासाठी राजभवन पाण्याच्या टाकीचे काम २० आणि २१ मार्चला करण्यात येणार असल्यामुळे आधीच शहरात पाण्याची टंचाई असतानाही शहरातील चार झोनमधील अनेक भागांना दोन दिवस पाणीपुरवठा होणार नाही.
दोन महिन्यापूर्वीच राजभवन पाण्याच्या टाकीचे काम हाती घेण्यात आले होते त्यावेळी शहरातील विविध भागात तीन दिवस पाण्याचा साठा बंद करण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा २० आणि २१ मार्चला काम करण्यात येणार आहे. त्यामुळे २० मार्चला सायंकाळपासून २४ तास पर्यंत राजभवन पाण्याची टाकी १ व २ वरून पाणी पुरवठा होणार नाही त्यामुळे नागरिकांना दोन दिवसांचा पाण्याचा साठा करावा लागणार आहे. आगामी २४ तासाच्या काळात महापालिका आणि ऑरेंज सिटी वॉटर वर्क्‍सतर्फे पेंच १ मधून राजभवन येथे येणाऱ्या इनलेट लाईनवर फ्लो मीटर लावण्यात येणार आहे. तसेच सेमिनरी हिल्सवरून राजभवनमध्ये येणाऱ्या ग्रॅव्हीटी मेन लाईनवर फ्लो मीटर लावले जाईल. राजभवनमधील पाण्याच्या टाक्या सेमिनरी हिल्या टाक्या व पेंच १ जलशुद्धीकरण केंद्र यांच्याशी प्रत्यक्ष जोडलेल्या असल्याने राजभवनवरून पाणी पुरवठा होणाऱ्या शहरातील पाण्याच्या टाक्यांना बुधवार २० मार्च सकाळी १० वाजेपासून २१ मार्च सकाळी १० वाजेपर्यंत पाणी पुरवठा होणार नाही. मंगळवारी, सतरंजीपुरा, धंतोली, सुभाष रोड फिडर मेन, वंजारीनगर, रेशीमबाग, ओंकारनगर, म्हाळगीनगर या भागातील पाण्याच्या टाकीवरून ज्या वस्त्यांना पाणीपुरवठा होतो तो दोन दिवस होणार नाही.
या शिवाय मध्य रेल्वे, अजनी रेल्वे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णलय, सुपर स्पेशालिटी इत्यादी आवश्यक सेवा असलेल्या संस्थाना दोन दिवस पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. या भागातील सर्वच मुख्य टाक्यांना पाणी मिळणार नसल्याने टँकरचीही व्यावस्था होऊ शकणार नाही.