नीरा नादीच्या उगम भागात अद्याप तरी अपु-याच झालेल्या पावसामुळे वरची धरणे व बंधारे भरलेले नाहीत. त्यामुळे नदीपात्रात पाणी नसल्याने सोलापूर जिल्ह्य़ात प्रवेश करताना तुकोबारायांना याही वर्षी टँकरनेच स्नान करावे लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
नीरा नदीवर वीर व  देवघर ही पाणी साठवण क्षमतेची मोठी दोन धरणे तर आहेतच शिवाय छोट-मोठे ६० बंधारे आहेत व त्यानंतर नदीपात्रात पाणी येते. या नदीच्या उगमस्थान असणाऱ्या परिसरात याही वर्षी तसा अपुराच पाऊस झाला आहे. त्यामुळे अद्याप नदीपात्र कोरडे ठणठणीत पडले आहे.
संत तुकोबारायांचा पालखी सोहळा सराटी येथील पुणे जिल्ह्य़ातील शेवटचा मुक्काम आटोपून दोन्ही जिल्ह्य़ांच्या सीमेवरून वाहणाऱ्या नीरा नदीत स्नान करून सोलापूर जिल्ह्य़ातील अकलूज येथे प्रवेश करतो. या ठिकाणी तुकोबारायांच्या पादुकांनाही नीरा स्नान घालण्यात येते. मात्र गतवर्षीही पाण्याची हीच अवस्था असल्याने भाविकांना तर नीरास्नान मिळाले नाहीच. परंतु पादुकांना स्नान घालण्यासाठीही पाणी नसल्याने नदीपात्रातील एका खड्डय़ात टँकरने पाणी ओतून पादुकांच्या नीरास्नानाचा धार्मिक कार्यक्रम उरकला होता.
या वर्षी पावसाचे आगमन लवकर झाल्याने नीरा नदीत पाणी येण्याची भाविकांची अपेक्षा होती. मात्र वीर व देवघर ही धरणे ३३ टक्के भरली असली तरी उर्वरित बंधारे भरणे बाकी आहे. शिवाय पालखी सोहळा येथे पोहोचण्यास ८/१० दिवसांचाच कालावधी उरला असताना पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे तुकोबारायांना या वर्षीही टँकर स्नानच करावे लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
 

Story img Loader