वरुणराजाचा कृपालोभ असलेल्या कोल्हापूर जिल्ह्य़ात पाण्याची उपलब्धता अंमळ आहे. तरीही पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ काही लाख लोकांवर सदोदित आलेली असते. पाण्याचा विनियोग करण्याच्या विवेकी दृष्टीचा अभाव हेच या मागे मुख्य कारण आहे. ‘नदी उशाला अन् कोरड घशाला’ अशी अवस्था कोल्हापूर, इचलकरंजी यासारख्या मोठय़ा शहरात पाहायला मिळते, तर डोंगर कपारी, जंगलाचा भाग असलेल्या वाडय़ा-वस्त्यांवर पाण्याच्या शोधार्थ सारा दिवस वाया घालविण्याची वेळ प्रत्येक उन्हाळ्यात येथेच येते. जलसंस्कृती, जलनियोजन यांच्या अभावामुळे बेमुवर्तखोर पाणी वापरले जात आहे. जलसाक्षरतेच्या अज्ञानामुळे याच जिल्ह्य़ात काविळीच्या बळीचे प्रमाण सर्वाधिक आहे. नद्या जलपर्णीयुक्त झालेल्या आहेत आणि त्यांच्या प्रदूषणाची मात्रा दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात दुष्काळामुळे दैना उडाली असताना कोल्हापूर जिल्ह्य़ातील पाणी वापराची चैन अस्वस्थ करणारी आहे. हे दुर्दैवी चित्र बदलणार तरी कधी, असा प्रश्न जलअभ्यासक, पर्यावरणवादी कार्यकर्ते यांना सतावत आहे.
कोल्हापूर जिल्ह्य़ामध्ये पावसाचे प्रमाण खूपच चांगले आहे. सरासरी २ हजार मि.मी. पाऊस पडत असल्याने जल ऐश्वर्य म्हणजे काय असते याचा अनुभव इथल्या नद्या, नाले, तलावातील बारमाही जलसंचय पाहून येत असतो. मुबलक पर्जन्यवृष्टीमुळे जलसाठे नेहमी भरून वाहात असतात. पाण्याच्या विपूलतेमुळे ‘अति तेथे माती’ या म्हणीचा अनुभवही जिल्ह्य़ात सर्वत्र येतो. पंचगंगा व तिच्या उपनद्या कृष्णा, वारणा, दूधगंगा, वेदगंगा, हिरण्यकेशी या नद्या राधानगरी, काळम्मावाडी, चांदोली यासारखी धरणे यामुळे जिल्ह्य़ाला पाण्याची उपलब्धता बारमाही आहे, पण याचा नेमकेपणाने वापर करण्याचे भान मात्र हरपले आहे. नियोजनाचा अभाव असल्यामुळे शहरी भागातही नळ सलग चार-पाच दिवस कोरडे राहात असतात. कोल्हापूर, इचलकरंजी या मोठय़ा शहरांमध्ये गळतीची समस्या गंभीर बनली आहे. गळती शोधून ती पूर्ववत करण्यात चार-पाच दिवस जात असल्याने आणि एका मागून एक गळतीचे सत्र कायम राहात असल्याने पाण्याची विवंचना नेहमीच जाणवत राहते.
राजर्षी शाहू महाराजांनी राधानगरी धरणाची उभारणी केली आणि पाणी वापराची प्रगल्भ दूरदृष्टी कशी असावी याचा वस्तुपाठ घालून दिला. त्यांनी दिलेली शिकवण नंतरच्या काळात राज्यकर्त्यांबरोबर रयतही विसरून गेली. पाण्याचे मुबलक साठे उपलब्ध झाल्याने बेबंद पाणी वापर सुरू झाला. नळाव्दारे पाणी उपलब्ध झाल्याने गंगा अंगणी अवतरली, पण त्याच्या वापराचा विवेक मात्र शिन झाला. दर माणसी पाण्याच्या वापराचे प्रमाण ओलांडून त्याहून अधिक जादा पाणी मिळू लागले, पण त्याचा अनिर्बंध वापर होऊ लागला. निसर्गाने दिलेल्या वरदानाचा फायदा घेण्याऐवजी बेसुमार वापर करून साक्षर असणारा जिल्हा पाणी वापरात किती अज्ञ……… आहे, याचा परिचय होऊ लागला आहे. पाणी वापराचे तारतम्य ठेवले नाही तर जलसंपन्नतेचा लोप होऊन पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ दूर राहणार नाही
कोल्हापूर जिल्ह्य़ातील नद्यांचे प्रदूषण ही गंभीर बाब बनली आहे. पंचगंगा नदी ही तर देशातील प्रमुख दूषित नद्यांतील एक आहे. कृष्णा, वारणा या नद्यांचे प्रदूषणही वाढतच चालले आहे. दूषित पाण्यामुळे आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे. पावसाळ्यात साथीच्या आजारांमुळे उडणारी दैना भयावह आहे. पाणी प्रदूषणाविरुध्द पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा, सजग नागरिकांचा लढा नेहमीच सुरू आहे. उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाल्या आहेत. न्यायालयाने अनेकदा कोल्हापूर महापालिका, इचलकरंजी नगरपालिका, उद्योग, साखर कारखाने यांना खडसावले आहे. पण ढिम्म शासन यंत्रणा आणि कणाहिन प्रदूषण नियंत्रण मंडळ यामुळे नदी प्रदूषणाला आवर बसण्याऐवजी त्यात वाढच होत आहे. पावसाळ्यानंतरचे काही महिने सोडले तर जिल्ह्य़ातील नद्यांवर हिरवागार गालिचा पसरल्याचे दिसते. दिसायला हे चित्र सुखावह असले तरी ती दुखदायक वेदनेची चादर आहे. अशा अतिदूषित पाणी पिण्यामुळे काविळीचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. गतवर्षी ३० हून अधिक जणांना काविळीने जिवाला मुकावे लागले आहे. इतका मोठा आघात होऊनही प्रशासन, उद्योग, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून कागदी घोडे नाचविण्याचेच काम सुरू आहे. त्यामुळे शेवाळ, दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठय़ामुळे नदीकाठावरील प्रत्येक गावातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. ……पंचगंगेचे गटारगंगेचे…. स्वरूप दिवसेंदिवस भीषण बनत चालले आहे.
शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड, गगनबावडा हा जिल्ह्य़ातला डोंगराळ भाग आहे. या तालुक्यातच पावसाचे प्रमाण सर्वाधिक आहे. पाणी नियोजनाचा अभाव या भागातही असल्याने त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसतो. डोंगर कपारीतील वाडय़ा-वस्त्यांवर राहणाऱ्या लोकांना उन्हाळा सुरू झाला की पाण्यासाठी भटकंती करावी लागते. पाणी मिळविण्यातच त्यांचा दिवस वाया जातो. पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत जंगल तुडवत पाणी मिळविण्याची कसरत या लोकांना करावी लागते. ते पाहून या भागात पाण्याचा सुकाळ आहे हे सांगूनही पटणार नाही. राज्यकर्त्यांच्या निष्क्रिय धोरणाचा फटका ही जनता वर्षांनुवर्षे सोसत आहे. काही भागांमध्ये पाण्याच्या योजना पूर्ण झाल्या. पण त्यामध्ये पाण्याची उपलब्धता करण्यात मात्र प्रशासनाला अपयश आले आहे.
पाणी अडवा पाणी जिरवा हा मंत्र उठसूट दिला जातो, पण तो प्रत्यक्ष राबविण्यात वर्षांनुवर्षे अपयशच आले आहे. नळांना मीटर बसविणे, चाव्यांना कॉक बसविणे याकडे दुर्लक्ष होत असल्याने लाखो लिटर पाणी वाया जात असते. पाण्याची उधळपट्टी प्रमाणाबाहेर होऊ लागली आहे. पाणी वापराची बेबंदशाही जनतेच्याच जगण्यावर येणारी आहे. जलसाक्षरतेचे अभियान राबविण्यासाठी प्रशासन पुढाकार घेते. काही जागृत नागरिकांकडून त्याला प्रतिसाद मिळतो, पण एकूण गोळाबेरीज करता पाणी असूनही त्याचे नेटके नियोजन दिसत नाही. गळक्या, भ्रष्ट यंत्रणेने सक्षम होणे आणि जनतेने भविष्याचा विचार करून योग्य पाणीवापर करण्याचे भान ठेवण्याची गरज आहे.
कोल्हापूरने व्हावे जलदाता
कोल्हापूर जिल्ह्य़ाला पावसाचे वरदान मिळाले आहे. कृष्णा, पंचगंगासह अन्य नद्या बारमाही वाहात असतात. याला धरण, तलावांतील जलसाठय़ांची साथ मिळालेली आहे. ऐन उन्हाळ्यातही पाण्याचा मुबलक वापर करणारी ऊस, भात यासारखी शेती केली जाते. पाण्याचा असा बेभान वापर करण्याऐवजी कोल्हापूरने आता जलदाता होण्याचा विचार करण्याची गरज आहे. शेजारचे जिल्हे दुष्काळात होरपळत असताना ही भूमिका निभावणे जिल्ह्य़ाचे कर्तव्य बनले आहे. जिल्ह्य़ातून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी दुष्काळी भागांकडे कसे वळविता येईल, याचा प्रभावीपणे विचार व कृती होण्याची गरज आहे. पुरोगामी जिल्हा म्हणून वावरणाऱ्या कोल्हापूरने वास्तवाची दाहकता लक्षात घेऊन कृतिशील पाऊल टाकण्याची गरज आहे.
कोल्हापुरात ‘पाणी उशाला अन् कोरड घशाला’
वरुणराजाचा कृपालोभ असलेल्या कोल्हापूर जिल्ह्य़ात पाण्याची उपलब्धता अंमळ आहे. तरीही पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ काही लाख लोकांवर सदोदित आलेली असते. पाण्याचा विनियोग करण्याच्या विवेकी दृष्टीचा अभाव हेच या मागे मुख्य कारण आहे. ‘नदी उशाला अन् कोरड घशाला’ अशी अवस्था कोल्हापूर, इचलकरंजी यासारख्या मोठय़ा शहरात पाहायला मिळते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 09-04-2013 at 01:24 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No water investment in kolhapur