लोकसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल, अशी शक्यता मला वाटत नसून शरद पवार यांना आम्ही काँग्रेससोबत जाण्याखेरीज अन्य कोणताही मार्ग शिल्लक ठेवलेला नाही. पवार यांना रालोआ सोबत घेण्याची आमची तयारी नसल्याचा पुनरुच्चारही ज्येष्ठ भाजप नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी केला. महायुतीत जागावाटपाचा कोणताही तिढा नसून महिन्याअखेरीस माढासह सर्व मतदारसंघाबाबत समन्वय व संवादातून तोडगा काढला जाईल, असा विश्वास व्यक्त केला. पायाखालची वाळू सरकल्यानेच हताश सत्ताधारी पक्ष महायुतीतील नेत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करत असून ही कृती विनाशकारी विपरीत बुद्धी असल्याचे अस्त्रही मुंडे यांनी सोडले.
 बीड येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना खासदार गोपीनाथ मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा केवळ पश्चिम महाराष्ट्रापुरता मर्यादित असल्याची खिल्ली उडवली. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार िशदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या वक्तव्यावर बोलताना मुंडे म्हणाले, िशदे हे शरद पवार यांना पंतप्रधान करायला निघालेले काँग्रेसचे नेते आहेत. त्यांचे कोणतेही वक्तव्य मी गांभीर्याने घेत नाही. महायुतीला राज्यात चांगले वातावरण असल्याने युतीच्या नेत्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत, पण त्याला आपण घाबरणार नाही. सत्ता आल्यानंतर हे सर्व गुन्हे मागे घेतले जातील. महायुतीत जागा वाटपावरुन कोणताही तिढा नाही. समन्वयाने मार्ग निघेल. भाजप-सेना युतीमध्येही जागा अदला-बदलीबाबत कोणतीही चर्चा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मला संपवण्याचे षडयंत्र-महादेव जानकर
या वेळी उपस्थित असलेले महादेव जानकर म्हणाले, माढा मतदारसंघावर राष्ट्रीय समाज पक्षाचा हक्क आहे. मी खासदार होण्यासाठीच आलो आहे. मात्र महायुतीतीलच काही नेते मला संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र अंतिम निर्णय हा मुंडे यांचा राहील, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा