दहीहंडी, गणेशोत्सवासारख्या उत्सवांमध्ये ध्वनिप्रदूषणासंबंधीच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी ठाणे पोलीस एकीकडे प्रयत्नशील असताना दुसरीकडे ‘चोर गोविदांच्या’ माध्यमातून ठाणे, कळवासारख्या शहरांमध्ये पुन्हा एकदा ध्वनिवर्धकांचा ढणढणात सुरू झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
ठाण्याचे सह-पोलीस आयुक्त व्ही.व्ही.लक्ष्मीनारायण यांनी घेतलेल्या कडक भूमिकेमुळे यंदा उत्सवांना ध्वनिवर्धक पुरविणार नाही, अशी भूमिका ठेकेदारांनी घेतली आहे. प्रत्यक्षात मात्र गोविंदांच्या सरावासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘चोर गोंविदा’ उत्सवात ध्वनिवर्धकांचा ढणढणात सुरू झाला असून या आयोजकांना ध्वनिवर्धक कुणी पुरविले याविषयी बहिष्काराची भाषा करणारे ठेकेदार मौन बाळगताना दिसत आहे. विशेष म्हणजे, लक्ष्मीनारायण यांच्यासारखा खमक्या अधिकारी ध्वनिप्रदूषणाविरोधात कठोर भूमिका घेत असताना स्थानिक पोलीस मात्र या ढणढणाटाकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.
दहीहंडी, गणेशोत्सव अशा उत्सवांमध्ये ध्वनिप्रदूषणासंबंधीचे नियम मोडण्यात अग्रेसर असणारे शहर म्हणून ठाण्याची ओळख बनू लागली आहे. सर्वोच्च न्यायालयाने यासंबंधी आखून दिलेल्या नियमांची येथील मंडळे सर्रासपणे पायमल्ली करताना आढळून येतात. ठाणे पोलिसांकडून अशा मंडळांच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात येतो. मात्र, ही कारवाई तोंडदेखले असल्याचे दिसून येते. यंदा मात्र सह-पोलीस आयुक्त लक्ष्मीनारायण यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे ध्वनिवर्धक पुरविणाऱ्या ठेकेदारांचे धाबे दणाणले आहेत. न्यायालयाने आखून दिलेल्या नियमांची पायमल्ली केल्यास तातडीने कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. त्यामुळे हादरलेल्या ठेकेदारांनी उत्सवांना ध्वनिवर्धक पुरवायचे नाहीत, अशी भूमिका घेतली आहे. प्रत्यक्षात मात्र ठेकेदारांच्या कथनी आणि वागण्यात फरक दिसू लागला असून ‘चोर गोिवदांना’ मोठय़ा आवाजाचे ध्वनिवर्धक पुरवून नियमांची पायमल्ली सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे.
दहीहंडीच्या पाश्र्वभूमीवर वेगवेगळ्या मंडळांतर्फे गोंविदा पथकांच्या सरावासाठी चोर गोविंदा उत्सव आयोजित केला जातो. या वेळी हंडी फोडणाऱ्या मंडळांना विशेष बक्षिसे दिली जातात. ठाणे शहरात लुइसवाडी, खोपट, चंदनवाडी, सावरकरनगर, लोकमान्य नगर अशा परिसरांत अनेक वर्षांपासून चोर गोविंदा उत्सव साजरे केले जातात. सराव शिबिराप्रमाणे आयोजित करण्यात येणाऱ्या उत्सवांमध्ये ध्वनिवर्धकांचा ढणढणाट असतो. लक्ष्मीनारायण यांच्या तंबीमुळे चोर गोविंदांमध्ये सुरू असणाऱ्या ढणढणाटाला यंदा आवर घातला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. प्रत्यक्षात मात्र चित्र उलटे दिसू लागले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा