सणासुदीचे दिवस आले की ढोल-ताशे याचबरोबर डीजेचे आवाज सुरू होतात. हे आवाज अनेकदा नकोसे वाटतात. आवाजांबाबत नियमावली असली तरी त्याचे पालन होताना दिसत नाही. आपण तक्रार करावी तर आपल्या परिसरात नेमका किती आवाज आहे हे तपासण्यासाठी आजपर्यंत आपल्याकडे कोणतेही साधन उपलब्ध नव्हते. आता आपल्या स्मार्टफोनमध्ये मात्र ‘नॉइज टय़ूब’ हे अ‍ॅप डाऊनलोड करून आपण आपल्या परिसरात नेमका किती डेसिबल आवाज आहे याची माहिती मिळवू शकतो.
ब्रुसेल विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी मुंबईतील काही विद्यार्थ्यांच्या सहकार्याने हे अ‍ॅप विकसित केले असून हे अ‍ॅप आवाज मोजण्याच्या जागतिक प्रमाणांच्या पातळीवर तपासून बाजारात आणल्यामुळे यातून येणाऱ्या निकालांबाबत विश्वासार्हता बाळगली जाते. हे अ‍ॅप अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणाऱ्या फोनवर उपलब्ध आहे. हे अ‍ॅप वापरण्यासाठी तुमच्या फोनमध्ये जीपीएस आणि मायक्रोफोन तसेच ऑडिओ रेकॉर्डर असणे गरजेचे आहे. यामध्ये आपण आपल्या आजुबाजूच्या परिसरातील आवाज ध्वनीमुद्रित करून तो या अ‍ॅपमध्ये अपलोड केला की आवाजाच्या प्रकारांपासून ते डेसिबलपर्यंतची माहिती देणारा एक तक्ताच आपल्यासमोर येतो. या तक्त्यामध्ये आपल्या विभागाचे नाव, हा विभाग ‘शांतता क्षेत्रा’त येतो की नाही याचाही तपशील येतो. याचबरोबर आपण ध्वनिमुद्रित केलेल्या आवाजामध्ये कोणत्या प्रकारच्या वाद्यांचा वापर करण्यात आला आहे, याचा प्राथमिक तपशीलही देण्यात येतो. हे अ‍ॅप मोफत उपलब्ध असून गणेशोत्सवाच्या काळात भारतात त्याचा प्रायोगिक तत्त्वावर वापर करण्यात आला. या माध्यमातून विविध ठिकाणच्या ध्वनी प्रदूषणाची माहिती गोळा करण्यात आली होती. आता नवरात्रौत्सवात विविध विभागांतील आवाज मोजण्यासाठी या अ‍ॅपचा वापर होऊ शकतो, अशी अपेक्षा या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
या अ‍ॅपमध्ये माहिती शेअरिंगची सुविधा देण्यात येणार आहे. यामुळे आपण आपल्याकडे आलेली माहिती कोणत्या विभागातील आहे याचबरोबर त्या विभागात किती वाजता किती ध्वनी प्रदूषण होते याचा तपशील फेसबुक किंवा ट्विटरसारख्या सोशल नेटवर्किंग साइटवर शेअरही करू शकणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा