उन्हाळ्यात उच्चांकी तापमानाची नोंद होणारा आणि रखरखीत प्रदेश म्हणून केवळ उत्तर महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात आपली ओळख निर्माण करणाऱ्या जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत पक्ष्यांच्या संख्येत लक्षणिय वाढ झाल्याचा निष्कर्ष महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना आणि वन्यजीव संरक्षण संस्था यांच्यावतीने सुरू असलेल्या सर्वेक्षणात पुढे आला आहे. महत्वाची बाब म्हणजे, दोन वर्षांपूर्वी पक्ष्यांच्या १३० प्रजातींची झालेली नोंदही यंदा सुमारे १९० हून अधिकवर पोहोचली आहे. तसेच जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच राखाडी मानेचा भारीट (ग्रे नेक्ट बंटींग), सिर्कीयर मालकोवा, ग्रेटर व्हाईट थ्रोट, ब्राऊन श्राईक आणि पेंटीग्रीन फाल्कन हे काही दुर्मिळ पक्षी आढळून आले आहे.
१९ ते २७ जानेवारी या कालावधीत उभय संघटनांनी पक्षी निरीक्षण, अभ्यास आणि गणना मोहीम हाती घेतली. पहिल्या टप्प्यातील निरीक्षणातून १९० हून अधिक प्रजातींच्या सुमारे तीस हजार पक्षांची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झरव्हेशन ऑफ नेचर (आययुसीएन) च्या ‘रेड डाटा’ सुचीत असलेल्या ११ पक्षांच्या प्रजातीही आढळल्या आहेत. टेरेस्ट्रीयल, वॉटरबर्ड, पॅसरीने बर्ड अशा त्रिस्तरीय पद्धतीने जिल्ह्यातील हतनुर व वाघूर धरण, धानवड तांडा साठवण तलाव, मनुदेवी साठवण तलाव या चार प्रमुख पाणवठय़ांसह यावल पश्चिम वन क्षेत्र, गायवाडा, लांडोर खोरी, शिवाजी उद्यान परिसर, तापी नदी काठ, कुऱ्हेपानाचे वनक्षेत्र, बहुळा, (पाचोरा), वडोदा, निमखेडी, हरताळा तलाव आदी ठिकाणी दोन गटांनी नोंदी घेतल्या. पक्षी नोंद करण्यासाठी भुसावळ व जळगाव येथील पक्षीप्रेमींची दोन वेगवेगळी पथके निर्माण करण्यात आली. या पथकांमार्फत स्थानिक पक्षी व स्थलांतरीत पक्षी अशा दोन विभागात नोंदी घेण्यात येत असून प्राथमिक निरीक्षणात पक्ष्यांची संख्या लक्षणिय वाढल्याचे निष्पन्न झाले आहे. अंतिम निरीक्षण हाती येईपर्यंत हा आकडा हजारोंच्या संख्येने वाढल्याचे लक्षात येईल, असा अंदाज गेल्या तीन वर्षांपासून या कामात सक्रिय असलेल्या गणेश कांबळे यांनी व्यक्त केला.
या मोहिमेंतर्गत गणेश सोनार यांना मनुदेवी वनक्षेत्र परिसरात प्रथमच राखाडी मानेचा भारीट (ग्रे नेक्ड बंटींग) तर यावल पश्चिम वनक्षेत्र परिसरात राहुल सोनवणे यांना सिर्कीयार मालकोवा आणि ब्राऊन श्राईक या दुर्मिळ पक्ष्यांचे दर्शन झाले. हतनूर परिसरात योगेश पोळ व नीलेश तायडेंना हरताळा परिसरात नयनसरी (फेश जीन्स पोचार्ड), पट्टाकदंब हंस, फ्लेमिंगो आदी पक्षी आढळून आले. आययुसीएनच्या रेड डाटा सुचीतील कॉमन क्रेन, डार्टर, फेस जीन्स पोचार्ड, व्हाईट आयबॉस, ब्लॅक ईगल आदी पक्ष्यांबरोबर पेन्टेड स्टॉर्क, ग्रेटर व्हाईट थ्रोट, ब्राऊन श्राईक, पेंटीग्रीन फाल्कन आदींची सलग दोन वर्षांपासून नोंद घेतली जात आहे.
तीन वर्षांतील आकडेवारी
पक्ष्यांची प्रजाती व त्या अनुषंगाने पक्ष्यांच्या संख्येत मोठी वाढ होणार असल्याचा प्राथमिक अंदाज महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना आणि वन्यजीव संरक्षण संस्थांनी व्यक्त केला आहे. झाडांची होणारी बेसुमार तोड, मनुष्याचा जंगलातील वाढता वावर, शासनाचे होणारे दुर्लक्ष, वाढते प्रदूषण आदी बाबींचा पक्ष्यांच्या वास्तव्यावर परिणाम होत असतो. या पाश्र्वभूमीवर, सातपुडा पर्वतराजीत वसलेले यावल पश्चिम वनक्षेत्र हे पक्षी अभयारण्य म्हणून विकसित करण्याची गरज या संस्थांनी मांडली आहे. २०११ मध्ये जळगाव जिल्ह्यात १३० प्रजातींची नोंद झाली असून ३७ हजार पक्षी आढळून आले होते. त्यापुढील म्हणजे २०१२ मध्ये १४९ प्रजातींची नोंद होऊन साठ हजार पक्षी आढळून आले. सध्या गणनेचे काम पूर्ण झाले नसतानाच प्रजातींच्या संख्येत लक्षणिय वाढ झाली असून यंदा पक्ष्यांची संख्या ९० हजारापर्यंत पोहोचण्याचा अंदाज गणेश कांबळे यांनी व्यक्त केला आहे.