कर्जत येथील तासगावकर ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूटच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास गुरुवार १५ मे रोजी आंदोलन करण्याचा इशारा व्यवस्थापनाला दिला आहे. सप्टेंबर २०१३ मध्ये तासगावकर ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूटच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी भारतीय कामगार सेनेचे सभासदत्व स्वीकारले. त्यामुळे व्यवस्थापनाने त्रास देण्यास सुरुवात केल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे. भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक यांच्या नेतृत्वाखाली युनियन आणि व्यवस्थापनाची बैठक झाली होती. त्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र ते सहा महिन्यानंतरही पूर्ण झाले नसल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत असून त्यादृष्टीने तयारी सुरू करण्यात आली आहे. सहा महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात आलेले नाही. कमिटी सदस्यांची नावे हजेरी रजिस्टरमधून काढण्यात आलेली आहेत. युनियनचा राजीनामा देण्याबाबत व्यवस्थापन कर्मचाऱ्यांवर दबाव टाकत आहे. कर्मचाऱ्यांना शासन नियमानुसार व कामगार कायद्याप्रमाणे वेतन मिळत नाही. कर्मचाऱ्यांच्या पगारातून पीएफची, जीवन विमा पॉलिसीची रक्कम कापण्यात येते, परंतु त्याचा भरणा संबंधित पीएफ कार्यालयात होत नाही, अशा अनेक तक्रारी कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा