‘बुरा ना मानो होली है’ असे म्हणत फाल्गुन पौर्णिमेनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी होळीची धुळवड उत्तर भारतीयांचे वास्तव्य असलेल्या नाशिक शहरातील काही भागात उत्साहात उडवली गेली. यंदाच्या धुली वंदनावर अस्मानी संकटाचे सावट असल्याने पूर्वीचा जल्लोष नसला तरी काही ठिकाणी उत्साह दिसून आला. नागरिकांनी पारंपरिक पध्दतीपेक्षा कोरडय़ा रंगाचा वापर केल्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळला गेल्याचे पहावयास मिळाले.
फाल्गुन पौर्णिमेनंतर दुसरा दिवस बऱ्याच ठिकाणी ‘धुलीवंदन’ म्हणून साजरा केला जातो. उत्तर भारतीय तसेच महाराष्ट्रातील काही भागात हा दिवस रंगपंचमीसारखा साजरा होतो. नाशिक शहरातील शिवाजीनगर, अंबड-सातपूर लिंक रोड, चुंचाळे आदी भागात उत्तर भारतीयांची संख्या मोठी आहे. या परिसरात धुलीवंदन साजरा करण्यावर विशेष जोर असल्याचे दिसले. उत्तर भारतीयांप्रमाणे बच्चे कंपनीने हा दिवस रंगपंचमी म्हणून कारणी लावला. नाशिकमध्ये होळीनंतरचा पाचवा दिवस ‘रंगपंचमी’ म्हणून साजरा केला जातो. उत्तर महाराष्ट्रातील काही भागात धुली वंदनाला महत्व असल्याने सोमवारी धूळवड उडविली गेली. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात उत्साह अधिक होता. शहरातील कामगार वसाहत असलेल्या सातपूर, सिडको परिसरात तसेच पंचवटी येथे धुळी वंदन उत्साहात साजरी झाली. अबाल वृध्दांसह अनेकांनी गुलाल वा कोरडय़ा रंगाचा टिळा लावत काही ठिकाणी एकमेकांवर रंगाची मुक्त हस्ते उधळण करत हा सण साजरा केला. बच्चे कंपनीने पिचकाऱ्यांनी रंगाची उधळण केली.
अनेक ठिकाणी गाण्यांच्या तालावर धुळवडीचा आस्वाद घेतला गेला. मागील पंधरा दिवसात नाशिकसह उत्तर महाराष्ट्राला अवकाळी पाऊस व गारपिटीने झोडपले आहे. यामुळे रंगपंचमीवर खर्च न करता तो गारपीटग्रस्त तसेच पिडीत शेतकऱ्यांना मदतीसाठी वापरावा असे आवाहन करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा