चौपदरीकरणामुळे विकसित होणारे नाशिक, सुवर्णनगरी म्हणून परिचित असणारे जळगाव, जिनिंग व कापड उद्योगासाठी प्रसिद्ध असणारे धुळे आणि लाल मिरचीसाठी ओळखले जाणारे आदिवासीबहुल नंदुरबार, हा उत्तर महाराष्ट्राचा विकासात्मक तोंडावळा. प्रत्येक जिल्ह्याची काही ‘खासीयत’ असली तरी त्यांच्या विकासात एकसमानता नाही. नाशिक ज्या पद्धतीने विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवित आहे, त्याच प्रकारे उर्वरित तीन जिल्ह्यांचे मार्गक्रमण झाल्यास उत्तर महाराष्ट्राच्या एकंदर विकासाला खऱ्या अर्थाने दिशा मिळू शकेल.
निसर्गाची मुक्त उधळण झालेल्या उत्तर महाराष्ट्रात शिवकालीन गड-किल्ले, धार्मिक तीर्थ, नांदुरमध्यमेश्वर व पाल अभयारण्य, राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ (नंदुरबार), इतिहासप्रेमींसाठी इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन संस्था, वाइनरीज् असे अनेक घटक आहेत. पर्यटनाला चालना देण्यासाठी आवश्यक असा हा ठेवा. या ठेव्यावर योग्य तऱ्हेने लक्ष केंद्रित केल्यास स्थानिक पातळीवर मोठी रोजगार निर्मिती होऊ शकते. पुणे, मुंबई व सूरत या तीन औद्योगिकदृष्टय़ा विकसित शहरांपासून नाशिक हे समान अंतरावर आहे. विशेष आर्थिक प्रकल्प, प्रस्तावित दिल्ली-मुंबई कॉरिडॉर, वाहन उद्योगातील बडय़ा उद्योगांचे सानिध्य यामुळे नाशिक देशाच्या नकाशावर झळकले आहे. सध्या उद्योगांसाठी जागा उपलब्ध होत नसल्याने औद्योगिक विस्तारावर काहिशा मर्यादा आल्याचे लक्षात येते. औद्योगिक विकास व शेतीचे पाठबळ लाभलेल्या नाशिकमध्ये कुशल मनुष्यबळ आणि उत्तम शैक्षणिक संस्थांचे जाळे आहे. मुंबईशी चारपदरी रस्त्याने जोडल्यामुळे आणि नाशिक-पुणे विस्तारीकरणाचा प्रश्न मार्गी लागल्याने नाशिकच्या विकासाला नवे परिमाण लाभणार आहे. रस्त्यांच्या विस्तारीकरणामुळे प्रवासाचा कालावधी तर कमी होईल, शिवाय उभय शहरांमधील उद्योजक व व्यापारी आस्थापनांना त्याचा लाभ होईल. कांदा, डाळिंब व टोमॅटो या कृषी उत्पादनात नाशिक आघाडीवर आहे. द्राक्ष निर्यातीच्या माध्यमातून उत्पादक मोठय़ा प्रमाणात परकीय चलन देशाला मिळवून देत आहेत. जिल्ह्याची जवळपास निम्मी अर्थव्यवस्था शेती व्यवसायावर अवलंबून असून अलीकडे वाइनरी उद्योगामुळे नाशिकची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. कृषी व औद्योगिक मालाची परदेशात थेटपणे वाहतूक करण्यासाठी हिंदुस्तान एरोनॉटीक्स लिमिटेड आणि कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून नाशिकलगतच्या जानोरी येथे उभारलेले हॅलकॉन कार्गो कॉम्प्लेक्स अर्थात मालवाहतूक सेवा केंद्र अद्याप पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालेले नाही. उत्तर महाराष्ट्रातील निर्यातीला या केंद्राद्वारे वेगळी दिशा मिळू शकते.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून सध्या तयारी सुरू आहे. त्या अनुषंगाने होणाऱ्या विकास कामांच्या नियोजनात त्यांचा कायमस्वरूपी उपयोग होईल याचा प्रामुख्याने विचार झाल्यास राहिलेला अनुशेष भरून काढता येईल. दर बारा वर्षांनी कोटय़वधी भाविक कुंभस्नानाचा पवित्र योग साधतात. लाखो भाविक या निमित्ताने नाशिकमध्ये येत असल्याने पर्यटन आणि स्थानिक व्यवसायात कोटय़वधींची उलाढाल होणार आहे. नियोजनपूर्वक आखणी केल्यास या धार्मिक उत्सवातून नाशिकचा चेहरामोहरा आणखी बदलविता येईल. तसेच नाशिकची महती आणि पर्यटन स्थळांची माहिती देशभर पसरविता येईल.
धुळे आणि मालेगाव हे जिनिंग आणि टेक्सटाईल उद्योगासाठी प्रसिद्ध आहेत. स्थानिक मालाच्या विक्रीची व्यवस्था झाल्यास त्यांचा विकास होऊ शकतो. खाद्यतेल निर्मितीत आघाडीवर असलेल्या धुळ्यात अन्नप्रक्रिया उद्योग, खाद्यतेल उद्योगांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. नंदुरबार आणि धुळे जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या भागात आशियातील सर्वात मोठा सौर प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. शिरपूर तालुक्यातील भूसंपादनाचा वाद मिटल्यास तिथेही पवन ऊर्जा प्रकल्पाचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
सुवर्ण पेढय़ा, केळी उत्पादन व डाळ मिल या सर्वाचे केंद्र म्हणजे जळगाव. सध्या या जिल्ह्यात २५० पेक्षा अधिक डाळ मिल आहेत. सुवर्णनगरी अशी ओळख असलेल्या जळगावमध्ये सुमारे पाच हजार सुवर्णकार आहेत. अलीकडील काळात राजकीयदृष्टय़ा या जिल्ह्याला सक्षम नेतृत्व मिळालेले नाही. उलट घरकुल घोटाळ्यामुळे शहराची बदनामीच अधिक झाली आहे. सक्षम राजकीय नेतृत्व मिळाल्यास जिल्हा निश्चितच विकासाकडे जोरदारपणे वाटचाल करू शकेल. केळी, डाळी आणि दागिने या घटकांमध्ये जिल्ह्याचे चित्र बदलण्याची ताकद आहे.
सातपुडा पर्वतराजीत वसलेल्या नंदुरबारमध्ये मिरचीच्या सोबतीने आयुर्वेदीक औषध संशोधन आणि अन्न प्रक्रिया उद्योगावर लक्ष केंद्रित करता येईल. आदिवासीबहुल भाग विकास प्रक्रियेत पिछाडीवर राहिला आहे. उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात भौगोलिक, सामाजिक व सांस्कृतिक वैविध्य आहे. प्रत्येक भागातील मूलभूत क्षमता लक्षात घेऊन त्यादृष्टिने विकासात्मक धोरण आखल्यास उत्तर महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात भरारी घेऊ शकेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा