दिवाळी म्हणजे इवल्याश्या पणतीने आसमंत उजळून टाकणारा दीपोत्सव. मराठी जनांसाठी दिवाळी म्हटलं की मन आतुरतेने वाट पाहत असते ते दिवाळी अंकांची. म्हणूनच दिवाळी अंक हा अक्षर फराळाचा शब्दोत्सव आहे. दिवाळीमध्ये पणती असो किंवा आकाशकंदिल यामुळे आसमंत प्रकाशमान होतो. तर, साहित्याच्या वाचनामुळे अंतर्मन प्रकाशित होते, अशी भावना असलेल्या मराठी माणसांच्या जीवनामध्ये नाटक, राजकारण याच्याइतकेच दिवाळी अंकांनाही महत्त्वपूर्ण स्थान आहे.
का. र. मित्र यांनी ‘मनोरंजन’ मासिकाचा पहिला दिवाळी अंक प्रकाशित केला त्याला आता १०३ वर्षे झाली. साहित्यसेवेची शतकोत्तर परंपरा असलेले महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. त्यावेळी पुस्तक प्रकाशित होण्याची संख्या मर्यादित होती. विविध प्रकारचे साहित्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी दिवाळी अंक हे एकमेव साधन असल्याचे का. र. मित्र यांच्या ध्यानात आले. त्यांच्या या अभिनव प्रयत्नांतूनच दिवाळी अंक या संकल्पनेला चालना मिळाली. सध्या मराठीमध्ये विविध दैनिके, साप्ताहिके, मासिके यांच्यासह केवळ साहित्य प्रकाराला वाहिलेले मिळून साडेचारशे ते पाचशे अंक प्रकाशित होतात आणि या अंकांची उलाढाल साधारणपणे सहा कोटी रुपयांच्या घरात आहे. कथा, कादंबरी, कविता अशी साहित्य निर्मिती करणाऱ्या लेखकांपासून ते चित्रकार, व्यंगचित्रकार, अंकाची सजावट करणारे सजावटकार, डीटीपी ऑपरेटर, मुद्रितशोधक आणि अंकांची विक्री करणारे विक्रेते अशी सर्व यंत्रणा यासाठी कार्यरत राहते. प्रामुख्याने जाहिरात हा उत्पन्नाचा स्रोत असलेल्या दिवाळी अंकांसाठी छपाई, लेखकांचे मानधन आणि विक्रेत्यांचे कमिशन हे खर्च असतात.
मराठी वाचकांच्या कक्षा रुंदावणारे साहित्य हे वैशिष्टय़ असलेल्या दिवाळी अंक चळवळीमुळे पु. ल. देशपांडे, प्रा. द. मा. मिरासदार, शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर, ह. मो. मराठे, मधू मंगेश कर्णिक, डॉ. आनंद यादव, शांता शेळके, अनुराधा पोतदार, ज्योत्स्ना देवधर, डॉ. अरुणा ढेरे, सुहासिनी इर्लेकर, रवींद्र िपगे यांसारखे साहित्यिक लाभले. तर, नंतरच्या काळामध्ये भारत सासणे, मोनिका गजेंद्रगडकर, रवींद्र शोभणे, आसाराम लोमटे, सुधीर गाडगीळ आणि प्रा. मिलिंद जोशी यांसारख्या लेखकांना या हक्काच्या व्यासपीठाने प्रस्थापित केले आहे. पूर्वी केवळ ललित साहित्य हाच दिवाळी अंकांचा विषय होता. मात्र, आता आरोग्य, ज्योतिष, रहस्यकथा, चित्रपट, पर्यटन, आध्यात्मिक, पाककृती असे विविध विषयांना वाहिलेले एवढेच नव्हे तर, मुले, गृहिणी अशांसाठीदेखील स्वतंत्र अंक प्रकाशित केले जातात. ललित साहित्य, वैचारिक आणि पुरोगामी साहित्याचा समावेश असलेल्या अंकांपेक्षाही आरोग्य, ज्योतिष आणि आध्यात्मिक विषयाच्या दिवाळी अंकांचा खप वाढताना दिसून येत आहे.
दिवाळी अंकाची निर्मिती आणि विक्री असे व्यवसायाचे गणित सोडविल्यानंतर स्थिरस्थावर झालेल्या संस्थांनी एकाहून अधिक दिवाळी अंक प्रकाशित करण्याची प्रथा सुरू झाली. किलरेस्कर-स्त्री-मनोहर (किस्त्रीम), मोहिनी-हंस-नवल, मीडिया नेक्स्टतर्फे माहेर-जत्रा, मौज प्रकाशन गृहातर्फे मौज आणि सत्यकथा, मॅजेस्टिक प्रकाशनतर्फे ललित आणि दीपावली, पद्मगंधा प्रकाशनतर्फे पद्मगंधा यांसह उत्तम अनुवाद आणि आरोग्य दर्पण, पुष्पक प्रकाशनतर्फे विशाखा आणि सखी गृहिणी असे विविध अंक वाचकांसाठी निखळ वाचनानंद लुटण्याची पर्वणी देत आहेत. युनिक फिचर्स संस्थेने विनोदाला वाहिलेला कॉमेडी कट्टा, मुलांसाठी पासवर्ड, भटकंतीवर बेतलेला मुशाफिरी, ललित साहित्यासह राजकीय-सामाजिक विषयांना वाहिलेला अनुभव असे चार दिवाळी अंक प्रकाशित केले आहेत. याखेरीज केवळ पुणे शहराला वाहिलेल्या ‘पुण्यभूषण’ या दिवाळी अंकाच्या साहित्यापासून ते निर्मितीपर्यंतची सारी संपादकीय जबाबदारी सलग दुसऱ्या वर्षी त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. दिवाळी अंकाच्या लेखांचे विषय निवडणे, लेखकांची सूची यापासून ते प्रत्यक्ष अंकाची छपाई होईपर्यंत अशी सारी कामे ही तारेवरची कसरत असते. मार्चअखेरीपासून त्याचे नियोजन सुरू होते आणि दिवाळीपूर्वी वाचकांच्या हाती अंक देण्याची जबाबदारी हे कष्ट आनंददायी असतात, अशी भावना युनिक फिचर्सच्या कार्यकारी संपादक गौरी कानेटकर यांनी व्यक्त केली.
साधना प्रकाशनने केवळ मुलांसाठी साधना बालकुमार हा अंक केवळ २५ रुपयांमध्ये उपलब्ध करून दिला आहे. हा सर्वात स्वस्त दिवाळी अंक असून भाग्यसंकेत या दिवाळी अंकाची किंमत सर्वाधिक म्हणजे २३० रुपये आहे. पूर्वी न्यूजप्रिंटवर केली जाणारी छपाई आता रंगीत आर्ट पेपरवर झाल्यामुळे दिवाळी अंकाचे निर्मिती मूल्य वाढले आहे. त्यामुळे सर्वसाधारणपणे दिवाळी अंकाच्या किमतीमध्ये यंदा २० टक्के वाढ झाली आहे. दिवाळी अंकाची सर्वाधिक मोठी बाजारपेठ साहित्य-संस्कृतीचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्येच आहे. दिवाळी अंकाच्या उलाढालीतील ५० टक्के खप केवळ पुण्यामध्येच होतो. मुंबईमध्ये दिवाळी अंकांना २५ टक्के मागणी असते आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये २५ टक्के अंक विकले जातात, अशी माहिती ‘अक्षरधारा’चे रमेश राठिवडेकर यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा