पत्ते न खेळण्याचा सल्ला देणाऱ्या दोन तरुणांवर चार-पाच जणांनी सशस्त्र हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारी ठाण्यात घडली. या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना २७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
रोहित मनोहर पालवे (२१), सागर लक्ष्मण जाधव (२४) आणि किरण काशीनाथ धारवेल (२९) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत; तर अंकुश चंदर वाघमारे (३०) आणि संकेत लक्ष्मण उत्तेकर (२५) अशी यातील जखमींची नावे असून त्यांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ठाणे येथील चंदनवाडी भागातील पाण्याच्या टाकीखाली सोमवारी सायंकाळी अंकुश आणि संकेत हे दोघे गप्पा मारत बसले होते. त्यांच्या बाजूला पालवे आणि त्यांचे साथीदार पत्ते खेळत होते. दरम्यान, पत्ते खेळू नका, पोलीस राऊंड मारतात, तुमच्यामुळे आम्हाला त्रास नको, असे अंकुशने त्यांना सांगितले. त्याचा राग आल्याने पत्ते खेळणाऱ्यांनी दोघांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. त्यानंतर दोघेजण शहीद उद्यानाच्या गेटजवळ येऊन थांबले असता, पालवे आणि त्याचे साथीदार त्या ठिकाणी आले व त्यांनी तलवार, लोखंडी रॉड, बांबूच्या साह्य़ाने दोघांवर हल्ला चढविला. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.