जिल्हा पुरवठा विभागात खांदेपालट होऊनही रास्तभाव दुकानातील धान्य व केरोसिनचा काळाबाजार मात्र मोठय़ा प्रमाणात सुरूच आहे. गेल्या आठ महिन्यांत तब्बल ४०० क्विंटल तांदूळ व २०० क्विंटल गहू काळ्या बाजारात जाताना पोलिसांनी जप्त केला. परंतु काळ्या बाजारात जाणाऱ्या धान्याला ब्रेक काही लागत नसल्याचे एकूण चित्र आहे. दरम्यान, उद्याच (गुरुवारी) अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख हिंगोलीत येत असून, त्यांच्या उपस्थितीत जिल्हा सार्वजनिक वितरण व ग्राहक संरक्षण विभागातील कामाची आढावा बैठक होणार आहे. लोकसभेच्या निमित्ताने मंत्री देशमुख यांचा दौरा असून, हिंगोलीची जागा काँग्रेसऐवजी राष्ट्रवादीला मिळविण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून जिल्ह्य़ातील पुढाऱ्यांसमवेत चर्चा करून कार्यकर्त्यांची मते ते जाणून घेणार असल्याची चर्चा आहे.
जिल्ह्य़ात गेल्या वर्षभरापासून रास्तभाव दुकानाच्या मालाचा काळाबाजार गाजत आहे. चौकशीच्या मागणीसाठी आमरण उपोषण झाले. पुरवठा विभागाच्या सचिवांनी जिल्हा प्रशासनास तक्रारीची चौकशी करून दोषींवर कारवाई करा. परंतु तथ्य नसल्यास तक्रारदारांवर गुन्हे दाखल करा, असे लेखी फर्मान काढले. परंतु प्रत्यक्षात असे काहीच घडले नाही. त्यामुळेच चौकशीत पाणी कुठे मुरले यावर बराच खल झाला.
धान्याचा काळाबाजार व गैरप्रकारात जिल्हा प्रशासनाने दोषींविरुद्ध ठोस कारवाई केली नाही. परिणामी अजून तरी या प्रकारांना आळा बसत नसल्याचे पाहावयास मिळते. गेल्या आठ महिन्यात हिंगोली पोलिसांनी वेगवेगळ्या वेळी कारवाई करताना रास्तभाव दुकानाचा काळ्या बाजारात जाणारा ४०० क्विंटल तांदूळ व २०० क्विंटल गहू जप्त करून गुन्हे दाखल केले. शनिवारी कळमनुरी पोलिसांनी ९९ क्विंटल तांदूळ जप्त करून चार आरोपींना पोलीस कोठडी दिली.
आज मंत्री घेणार आढावा
अन्न व नागरी पुरवठा मंत्री देशमुख उद्या जिल्ह्य़ातील सार्वजनिक वितरण व ग्राहक संरक्षण विभागातील कामांचा एका बैठकीत आढावा घेणार आहेत.