नरेंद्र मोदी व सुरेश प्रभू यांच्या यंदाच्या रेल्वेअर्थसंकल्पात बुलढाणा जिल्ह्याला भोपळा मिळाला आहे. या रेल्वे अर्थसंकल्पात देशात बुलढाणा जिल्हा आहे की नाही, याची साधी दखलही घेण्यात आलेली नाही.
खामगाव-जालना हा रेल्वेमार्ग १०९ वर्षांपासून प्रस्तावित आहे. गेल्या सहा वर्षांपासून बुलढाण्याचे शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव हा मार्ग होईल, अशी राणा भीमदेवी थाटात घोषणा करतात. मात्र, यावर्षी देखील या मार्गाचा साधा उल्लेख या अर्थसंकल्पात नाही, श्री संत गजानन महाराजाचे राष्ट्रीय तिर्थक्षेत्र शेगावच्या रेल्वे स्टेशनच्या आधुनिकीकरणाचा कुठलाही नवा प्रस्ताव या अर्थसंकल्पात नाही. जिल्ह्य़ातील मलकापूर रेल्वे स्टेशनवर अधिक सुविधा देण्यासोबत रेल्वे मालवाहू धक्क्याच्या आधुनिकीकरणाच्या संदर्भात ठोस तरतूद करण्यात आली नाही. या संदर्भात शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, या अर्थसंकल्पाने बुलढाणा जिल्ह्य़ाच्या तोंडाला पाने पुसली आहेत. शेगाव रेल्वे स्टेशनवर सर्व गाडय़ांना थांबे देण्यात यावेत, खामगाव जालना रेल्वे मार्ग पुरवणी अर्थसंकल्पात मंजूर करण्यात यावा, अशा मागण्या त्यांनी केल्या.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा