महागाईला रोखण्यासाठी मोठी संधी असताना सामान्य नागरिक आणि व्यापार क्षेत्रासाठी कुठलीच सकारात्मक घोषणा करण्यात आली नाही त्यामुळे अतिशय निराशाजनक म्हणून याचे वर्णन करावे लागेल. आयकर आणि सेवाकराकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. विदेशी गुंतवणूक आणि शेअर बाजाराला लाभ पोहचणारा हा अर्थसंकल्प आहे. सरकारच्या विविध क्षेत्रासाठी बँकेच्या सहकार्याने अनेक अर्थसहाय्य योजना असताना व्यापार क्षेत्रासंबंधी अशी कुठलीही योजना नाही. या अर्थसंकल्पात त्या संदर्भातील घोषणा होईल अशी अपेक्षा असताना व्यापारांच्या हिताच्या दृष्टीने कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही. निराशाजनक अर्थसंकल्प असल्याचे मत अखिल भारतीय व्यापारी महासंघाचे अध्यक्ष बी.सी. भरतिया यांनी व्यक्त केले.
विदर्भ टॅक्स पेअर असोसिएशनचे अध्यक्ष तेजिंदरसिंग रेणू यांनी बजेटविषयी संताप व्यक्त केला. महगाईच्यावर एखादा रामबाण उपाय अर्थमंत्री सुचवतील याकडे सर्वाचेच लक्ष होते मात्र, एकूण निराशाच झाली. कृषी, सिंचन, उद्योग, हॉटेल, बांधकाम क्षेत्रासाठी काही पॅकेज घोषित केले मात्र, या क्षेत्राची वाढ होऊन रोजगाराच्या दृष्टीने त्यांना कितपत प्रोत्साहन मिळेल, यावर अर्थमंत्री काहीच बोलले नाही.
वर्तमान स्थितीला पाहता ‘निर्भय फंड’ ही बाब महिलांसाठी चांगली आहे. पर्यटनाच्या दृष्टीने अर्थमंत्र्यांनी कोणताही दिलासा दिला नसून भारतातील पर्यटन किंवा ऐतिहासिक स्थळांच्या भेटी महागडय़ा असून २२ ते २३ हजार रुपयांत थायलंडमध्ये बँकॉक पाहणे होते. उलट देशांतर्गत पर्यटनासाठी चांगल्या योजना किंवा पॅकेज मिळाले असते तर आपली अर्थव्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत झाली असती.  बँकिंगच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प चांगला असला तरी नवीन दिशा देणारा नाही. सहकारी संस्थावरील कर माफ केलेला नाही. महिलांसाठी नव्या बँकेची घोषणा केली असली तरी ती राष्ट्रीयीकृत, सहकारी की खाजगी, हे स्पष्ट केलेले नाही. सर्वसामान्य माणसासाठी हा अर्थसंकल्प नसून तो केवळ उच्चभ्रू वर्गासाठी आहे. नाबार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी दोनशे कोटी रुपये हे चांगले असले तरी ते प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत कसे पोहोचविणार, हा प्रश्नच आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाद्वारे भरपूर वेतन वाढविले असले तरी पाच लाख रुपयांपर्यंतच्या प्राप्तिकरात केवळ २ हजार रुपये सूट दिली. एकीककडे दिलेले भरघोस वेतन दुसऱ्या बाजूने सरकार काढून घेत आहे, अशी प्रतिक्रिया विदर्भ प्रिमिअर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे मानद सचिव श्रीपाद रिसालदार यांनी व्यक्त केली. 

Story img Loader