महाविद्यालयाचे आदेश धुडकावल्याचा ठपका ठेवून, तसेच अशासकीय महाविद्यालयीन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. आर. बी. सिंग यांच्याबरोबर कामाचे ठिकाण व काम सोडून एक तास बैठक घेतल्याचा ठपका ठेवून डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर देसाई यांनी महाविद्यालयातील ३७ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन कापण्याची जाहीर नोटीस बजावली आहे. महाविद्यालयाच्या या सततच्या नोटीस-सत्रामुळे कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पेंढरकर महाविद्यालयात कर्मचाऱ्यांवर व्यवस्थापनाकडून खूप अन्याय होत असल्याची माहिती मिळाल्यावरून कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. आर. बी. सिंग दहा दिवसापूर्वी महाविद्यालयात आले होते. त्या वेळी सिंग येण्यापूर्वीच प्राचार्या निघून गेल्याने उपप्राचार्याशी चर्चा करून सिंग निघून गेले होते. आपल्याला महाविद्यालयाकडून हेतुपुरस्सर टाळण्यात येत असल्याची खात्री झाल्याने डॉ. सिंग यांनी गेल्या आठवडय़ात महाविद्यालयात अचानक धडक मारली. प्रभारी प्राचार्या डॉ. सुवर्णा देव रजेवर असल्याने त्यांचे बंद दालन उघडून दालनात बसून संघटनेच्या सदस्यांशी महाविद्यालयाकडून होत असलेल्या अन्यायाबाबत चर्चा केली.
डॉ. सिंग यांच्या महाविद्यालय भेटीला अनुसरून अध्यक्ष प्रभाकर देसाई यांनी मंगळवारी कार्यालयातील फलकावर कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली आहे. ‘‘सिंग हे कोणतीही पूर्वसूचना न देता महाविद्यालयात आले होते. अनधिकृतपणे प्राचार्याची बंद खोली उघडून त्यात कामाच्या वेळेत सदस्य कर्मचाऱ्यांबरोबर एक तास बैठक घेतली.
 या बैठकीला कर्मचारी कामाचे ठिकाण व काम सोडून एक तास उपस्थित राहिल्याने त्या २१ कर्मचाऱ्यांचे एक तासाचे वेतन कापण्यात येणार असल्याचा इशारा नोटिशीत देण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारच्या सुट्टय़ा रद्द करण्यात आल्या आहेत; तरीही १६ कर्मचाऱ्यांनी शनिवार ५ जानेवारी रोजी सुट्टी घेतली आहे. त्यांच्या सुटय़ांबाबत मंडळाने या सुट्टीबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्या कर्मचाऱ्यांचेही एक दिवसाचे वेतनही कापण्यात येणार असल्याचा इशारा देणारी नोटीस पेंढरकर महाविद्यालयाच्या फलकावर लावण्यात आली आहे. प्र-प्राचार्या डॉ. देव रजेवर असल्याने देसाई यांच्या सहीने या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
या नोटीस-सत्रामुळे कर्मचारी हैराण झाले आहेत. एकही जुना विश्वस्त या प्रकरणी कर्मचाऱ्यांची बाजू ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा