कुर्ला परिसरातील तब्बल २२ नर्सिग होम्स तात्काळ बंद करण्याची नोटीस पालिकेने बजावली आहे. मात्र सर्व आवश्यक ती कागदपत्रे असतानाही पालिका अधिकाऱ्यांनी केवळ आकसबुद्धीने नोटीस बजावून नर्सिग होम्स बंद करण्याचा आदेश दिल्याचा आरोप या परिसरातील डॉक्टरांकडून करण्यात येत आहे. तसेच पालिका अधिकाऱ्यांविरुद्ध रस्त्यावर उतरण्याची तयारी डॉक्टरांनी केली आहे.कुर्ला परिसरात मोठय़ा प्रमाणावर अनधिकृत दवाखाने थाटण्यात आले आहेत. त्याविरुद्ध येथील काही डॉक्टर मंडळींनीच आवाज उठविला होता. माहितीच्या अधिकाराअंतर्गत माहिती मिळवून या परिसरातील अनधिकृत दवाखान्यांची यादी या डॉक्टरांनी पालिका अधिकाऱ्यांना सादर केली होती. मात्र अनधिकृत दवाखान्यांना अभय देत या अधिकाऱ्यांनी २२ नर्सिग होम्सना नोंदणी देण्यास नकार दिला. तसेच ही नर्सिग होम्स तात्काळ बंद करण्याच्या नोटिसाही बजावल्या, असे या डॉक्टरांचे म्हणणे आहे. पालिकेच्या या मुजोर अधिकाऱ्यांविरुद्ध रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही या डॉक्टरांनी दिला आहे.
नर्सिग होम्सविरुद्ध बजावलेल्या नोटीसा मागे घ्याव्यात, भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करावे आणि मुंबईतील झोपडपटय़ांमधील नर्सिग होम्सबाबत कायदा करावा, आदी मागण्या डॉक्टरांनी केल्या आहेत.

Story img Loader