कॉंग्रेसचे नगरसेवक करीम लाला काझी यांच्या गुन्ह्य़ांची यादी वाढतच चालली असून, आपणास चंद्रपूर जिल्हा व लगतच्या जिल्ह्य़ातून दोन वर्षांकरिता हद्दपार करण्यात का येऊ नये, या आशयाची कारणे दाखवा नोटीस उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी बजावल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
एकोरी प्रभागाचे कॉंग्रेसचे नगरसेवक करीम लाला काझी यांच्यावर चंद्रपूर शहर, रामनगर व घुग्घुस पोलीस ठाण्यांतर्गत विविध गुन्हे दाखल आहेत. शहर पोलीस ठाण्यात आठ गुन्हे दाखल असून, रामनगर पोलीस ठाण्यात तीन, गडचांदूर पोलीस ठाण्यात एक व घुग्घुस पोलीस ठाण्यात दोन गुन्हे आहेत. यातील बहुतांश गुन्हे ‘क्रिमिनल’ सदरात मोडणारे आहेत. वरील सर्व गुन्ह्य़ांमध्ये करीम लाला काझी शिक्षेस पात्र आहेत. त्यामुळे वरील सर्व आरोपांचे स्पष्टीकरण देण्यासाठी, तसेच स्वत:चे म्हणणे मांडण्यासाठी आज २३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता करीम लाला काझी यांना उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी बोलाविले होते. त्यानुसार काझी यांनी स्वत: हजर राहून स्वत:चे म्हणणे सादर केले.
काझी यांच्या बयाणाने पोलिसांचे समाधान झाले नाही, तर मुंबई पोलीस कायद्याचे कलम ५६ अ व ब अन्वये चंद्रपूर जिल्हा व लगतच्या जिल्ह्य़ातून दोन वर्षांकरिता हद्दपार करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या या नोटीशीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, करीम लाला यांना काही दिवसापूर्वीच दुर्गापूर मार्गावरील एका क्लबमध्ये जुगार खेळतांना पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली होती. हद्दपारीची कारणे दाखवा नोटीस मिळताच करीम लाला यांनी स्वत:चा बचाव करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा