जिल्हा सरकारी दवाखान्यातील डॉक्टरांना सातत्याने राजकीय कार्यकर्त्यांच्या दबावाला सामोरे जावे लागते. डॉक्टरांशी उद्धट, अरेरावीचे वर्तन करण्याचे अनेक प्रकार पूर्वी घडले. या सर्व प्रकारांची जिल्हाधिकारी एस. पी. सिंह यांनी अखेर गंभीर दखल घेतली. डॉक्टरांनीही रुग्ण, तसेच त्यांच्या नातेवाईकांशी संवेदनशील असावे, असे सुचविले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बठकीत ते बोलत होते. जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय सावरीकर, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले, डॉ. रवी कुलकर्णी आदी उपस्थित होते. जिल्हा रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय यांच्याशी रुग्णांचे नातेवाईक हुज्जत घालतात, अरेरावी करतात अशी तक्रार डॉक्टरांनी जिल्हाधिकारी सिंह यांच्याकडे केली. त्याची सिंह यांनी गंभीर दखल घेऊन आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. यापूर्वी डॉक्टरांना झालेल्या मारहाण प्रकरणांचा वेगाने तपास करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षकांना देण्यात आले. तपास अधिकाऱ्यांनी अशा प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सजग राहावे, असे ते म्हणाले. रुग्णालयात काही व्यक्ती नियमित येऊन रुग्णांवर तातडीने  उपचार करावे, सलाईन लावावे, असा आग्रह धरतात, अशा व्यक्तींविरुद्ध योग्य ती कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. रुग्ण वा त्यांच्या नातेवाईकांची मानसिकता समजून घेऊन डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय यांनी आपली वर्तणूक ठेवावी. रुग्णांशी, त्यांच्या नातेवाईकांशी नम्र वागणूक ठेवल्यास असे प्रकार निश्चितच कमी होतील, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
जिल्ह्य़ात लवकरच राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू होणार असून त्याअंतर्गत जिल्ह्य़ातील १० खासगी रुग्णालये जोडली जातील, त्यानंतर जिल्हा रुग्णालयावर पडणारा ताण कमी होईल, असेही सिंह म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा