महानगरपालिकेचे आयुक्त विजय कुलकर्णी यांच्या निवासस्थानासमोर शांततेने आंदोलन करणा-या दीपक चांदमल वर्मा (रा. माणिक चौक, नगर) यांना पोलिसांनी आयुक्तांच्या सांगण्यावरून बेकायदा डांबून ठेवल्याने वर्मा यांची मुक्तता करून त्यांना न्यायालयासमोर हजर करावे, या मागणीसाठी वर्मा यांचा मुलगा प्रेमचंद यांनी आज अर्ज दाखल केला. या अर्जावर आयुक्त, मनपा अतिक्रमण विभागाचे प्रमुख इथापे व तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक या तिघांनी सोमवारी (दि.२१) म्हणणे सादर करावे असा आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिका-यांनी आज दिला.
प्रेमचंद वर्मा यांनी वकील शिवाजी सांगळे यांच्यामार्फत न्यायालयात हा अर्ज फौजदारी प्रक्रिया कलम ९७ अन्वये दाखल केला. दीपक वर्मा यांनी माणिक चौकातील त्यांच्या दुकानासमोर, रस्त्यावर मांडलेल्या पथारीचा माल मनपा अतिक्रमण विभागाने उचलून नेला. मनपा अतिक्रमण विभागाने इतर दुकानदारांविरुद्ध कारवाई न करता केवळ आपल्याविरुद्ध कारवाई केल्याने जप्त केलेला माल परत द्यावा, अशी वर्मा यांची मागणी आहे व त्यासाठी त्यांनी आयुक्तांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
त्यानुसार वर्मा यांनी आयुक्तांच्या निवासस्थानासमोर धरणे धरले. मात्र पोलिसांनी त्यांना तोफखाना ठाण्यात सकाळी ११ पासून बसवून ठेवले. आपले वडील शांततेने आंदोलन करत असताना पोलिसांनी आयुक्तांच्या सांगण्यावरून त्यांना बेकायदा डांबून ठेवले, त्यामुळे त्यांना न्यायालयासमोर हजर करावे, असा अर्ज प्रेमचंद यांनी दाखल केला. प्रेमचंद यांनी सकाळी पोलिसांकडे चौकशी केली असता, त्यांना अधिका-यांनी दीपक वर्मा यांना अटक केली नाही, त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचे उत्तर मिळाले. परंतु प्रतिबंधात्मक कारवाईसाठी पोलिसांनी पूर्वसूचनेची नोटीस दिलेली नाही, त्यामुळे त्यांना बेकायदा डांबून ठेवल्याचेच स्पष्ट होते, असा दावा वकील सांगळे यांनी केला. न्यायालयाने आयुक्त, अतिक्रमण विभागप्रमुख व तोफखाना पोलीस निरीक्षक या तिघांना म्हणणे सादर करण्यासाठी नोटिसा जारी करण्याचे आदेश दिले. पुढील सुनावणी सोमवारी ठेवली आहे.
मनपा आयुक्त, पोलीस निरीक्षकासह तिघांना न्यायालयाच्या नोटिसा
महानगरपालिकेचे आयुक्त विजय कुलकर्णी यांच्या निवासस्थानासमोर शांततेने आंदोलन करणा-या दीपक चांदमल वर्मा (रा. माणिक चौक, नगर) यांना पोलिसांनी आयुक्तांच्या सांगण्यावरून बेकायदा डांबून ठेवल्याने वर्मा यांची मुक्तता करून त्यांना न्यायालयासमोर हजर करावे, या मागणीसाठी वर्मा यांचा मुलगा प्रेमचंद यांनी आज अर्ज दाखल केला.
First published on: 19-05-2013 at 01:29 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Notice to mnc commissioner and police inspector by court