सांगली महापालिका निवडणुकीत झालेल्या कथित गैरव्यवहारप्रकरणी संबंधित पक्षकारांना जानेवारीपर्यंत म्हणणे मांडण्याचे आदेश मंगळवारी सत्र न्यायालयाने दिले. विविध कारणांवरून विद्यमान १२ नगरसेवकांच्या पात्रतेबाबत न्यायालयात खटले दाखल असून, आज या सर्व खटल्यांच्या संदर्भात नगरसेवकांसह राज्य निवडणूक आयोग व महापालिका यांना हजर राहण्याबाबत न्यायालयाने नोटिसा बजावल्या होत्या.
जुलै २०१३ मध्ये झालेल्या सांगली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करीत १२ नगरसेवकांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या याचिका दिवाणी न्यायालयात दाखल झाल्या आहेत. यामध्ये निवडणुकीत मतदारांना भुलविण्यासाठी पशाचे वाटप केल्याप्रकरणी अपक्ष नगरसेवक अनिल कुलकर्णी, राष्ट्रवादीचे नगरसेवक जुबेर चौधरी, महापालिका कार्यालयावर दगडफेक केल्याप्रकरणी न्यायालयाने शिक्षा ठोठावलेले काँग्रेसचे सुरेश आवटी, राष्ट्रवादीचे मनुद्दीन बागवान, अतिक्रमण करून बांधकाम केल्याप्रकरणी काँग्रेसचे विवेक कांबळे आदींसह शिवाजी दुर्वे, शांताबाई जाधव, संगीता खोत आदी १२ नगरसेवकांच्या निवडीला याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे.
या सर्वच दाव्यांची सुनावणी मंगळवारी सत्र न्यायालयाच्या विविध खंडपीठासमोर सुरू झाली. आपले म्हणणे मांडण्यासाठी न्यायालयाने दि. ८ जानेवारीपासून २२ जानेवारीपर्यंत वेगवेगळय़ा तारखा दिल्या आहेत. महापालिका व निवडणूक आयोगाने म्हणणे मांडण्यासाठी न्यायालयाकडून मुदत घेतली आहे.
सांगली पालिका निवडणुकीबाबत १२ नगरसेवकांना नोटिसा
सांगली महापालिका निवडणुकीत झालेल्या कथित गरव्यवहारप्रकरणी संबंधित पक्षकारांना जानेवारीपर्यंत म्हणणे मांडण्याचे आदेश मंगळवारी सत्र न्यायालयाने दिले.
First published on: 12-12-2013 at 02:00 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Notices 12 corporators to about sangli municipal elections