आश्रमशाळेतील महिलांवरील लैंगिक छळाच्या गुन्ह्य़ाबद्दल पोलिसांना गेले पंधरा दिवस गुंगारा देणारे माजी आमदार लक्ष्मण माने आज पोलिसांना शरण आले. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. दरम्यान, माने यांना अटक होत असतानाच त्यांच्याविरुद्ध आज आणखी एका महिलेने लैंगिक छळाची तक्रार दाखल केली आहे.
माजी आमदार लक्ष्मण माने कार्याध्यक्ष असलेल्या शारदाबाई पवार आश्रमशाळेतील तब्बल सात महिलांनी त्यांच्याविरुद्ध लैंगिक व मानसिक छळ होत असल्याची सातारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या महिला पददलित असून नोकरी टिकवण्याच्या दबावातून मानेंनी त्यांच्यावर २००३ ते २०१० पर्यंत अत्याचार केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. लैंगिक छळाचे हे गुन्हे दाखल झाल्यानंतर गेले पंधरा दिवस माने बेपत्ता होते. विविध पक्ष, महिला संघटना, दलित चळवळीतील कार्यकर्ते यांनी मानेंच्या अटकेची व त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी केल्यानंतरही मानेंना पडकण्यात पोलिसांना यश येत नव्हते. दरम्यान, काल या संस्थेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माने यांनी पोलिसांसमोर शरण यावे अशी मागणी करताच ते आज पोलिसांसमोर हजर झाले.
दरम्यान, पोलिसांसमोर शरण येत असताना माने यांनी आपणाला या गुन्ह्य़ात गुंतवण्यात आले असून यामागे बाळकृष्ण रेणके, पल्लवी रेणके, हरी नरके आदी चळवळीतीलच कार्यकर्त्यांचा हात असल्याचा आरोप केला.
दरम्यान, माने यांच्याविरुद्ध आज आणखी एका महिलेने लैंगिक छळाची तक्रार दाखल केली आहे. यामुळे त्यांच्याविरुद्ध तक्रार देणाऱ्या महिलांची संख्या आता सात झाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा