लाचप्रकरणी अधिकारी आणि सामान्य नागरिक यांच्यामध्ये आर्थिक मध्यस्थी करण्यावरही आता कारवाई होणार आहे. त्यासाठी कायद्यामध्ये तशी तरतूद असल्याचा इशारा लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे उपअधीक्षक श्रीहरि पाटील यांनी दिला.
लाचलुचपत प्रतिबंध विभागातर्फे दक्षता सप्ताहानिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तहसीलदार सुधाकर भोसले होते. तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन जगताप, शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सुर्वे, लाचलुचपत विभागाच्या निरीक्षक वैशाली पाटील, निवासी नायब तहसीलदार बी. एम. गायकवाड, नायब तहसीदार मीनल भामरे-भोसले उपस्थित होते.
पाटील म्हणाले, की आशिया खंडातील कोरिया, सिंगापूर येथे भ्रष्टाचार आणि लाच वज्र्य करण्यात आली आहे. स्वीडन या देशात लोकपाल रुजले आहे. त्या देशातील एक महिला मंत्री एक मॉलमध्ये खरेदीसाठी गेली असताना, तिने घरगुती खरेदीसाठी शासकीय कार्ड वापरल्याचे बिल करणाऱ्या एका मुलीच्या लक्षात आल्यानंतर तिने थेट लोकपाल यांना त्याची माहिती दिली आणि त्या महिलेचे मंत्रिपद गेले. हे देश एवढे प्रगत होत आहेत. त्यामध्ये आपणही सहभागी झाले पाहिजे. एखाद्या अधिकाऱ्याच्या मालमत्तेची माहिती नावानिशी कळविल्यानंतर त्यांचीही चौकशी करण्याचे काम लाचलुचपत प्रतिबंध विभागामार्फत केली जाते.
तहसीलदार सुधाकर भोसले यांनी उपस्थितांना शपथ दिली. निरीक्षक वैशाली पाटील, पोलीस निरीक्षक नितीन जगताप, तलाटी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकात पारवे यांनी मनोगत व्यक्त केले.

Story img Loader