एकीकडे १०० कोटी क्लबचा नायक म्हणून जबाबदारी सांभाळताना दुसरीकडे पत्नी काजोलचीही काळजी घ्यायचे आव्हान अजय देवगणने लीलया पेलले आहे. आणि म्हणूनच काजोलसाठी चांगला चित्रपट करता यावा, यासाठी अजय स्वत:च पटकथा लिहितोय. हे कमी होते म्हणून की काय, पण आता सासूबाईंनी हाती घेतलेले कामही पुढे नेण्याची जबाबदारी जावई म्हणून अजयवर येऊन पडली आहे. लोणावळ्याच्या निसर्गरम्य परिसरात अजयच्या सासूबाईंनी म्हणजेच अभिनेत्री तनुजाने टुमदार घर विकत घेतले आहे. त्यामुळे तेथील ‘लोणावळा-खंडाळा सिटिझन फोरम’ (एलकेसीएफ) या संस्थेशीही ती जोडली गेली आहे. या संस्थेच्या माध्यमातून लोणावळा-खंडाळा परिसराचा विकास साधण्याच्या मोहिमेत तनुजाने हिरिरीने सहभाग घेतला असून तिला या कामी मदत करण्यासाठी मुलगी काजोल आणि जावई अजय देवगण दोघेही पुढे सरसावले आहेत.
लोणावळा-खंडाळा येथील निसर्गरम्य सौंदर्य अबाधित राहावे, येथील बागा, खेळांची मैदाने जपली जावीत, यासाठी मोठय़ा प्रमाणावर एलकेसीएफने अभियान हाती घेतले असून जनजागृतीसाठी ११ मे २०१३ रोजी एका मोठय़ा फनफेअरचे आयोजन करण्यात येणार आहे. यात मुलांसाठी खेळ, पपेट शोज आणि मनोरंजनाचे भरपूर पर्याय असतील. या फनफेअरचा मनमुराद आनंद लुटायचा आणि त्याच आनंदात ‘एलकेसीएफ’च्या अभियानासाठी दानधर्म करायचा, अशी ही थोडक्यात योजना आहे. दानपेटीत जमा होणाऱ्या निधीचा वापर लोणावळ्यातील दुर्गम भागांत विद्युत पुरवठा करणे, रोजगारनिर्मितीचे प्रयत्न करणे अशा योजनांसाठी करण्यात येणार आहे. लहानपणापासून लोणावळा-खंडाळा परिसरात मनमुराद भटकलेल्या काजोलनेही आईला आपला पाठिंबा दर्शवला असून या जत्रेच्या तयारीसाठी ती आणि अजय लोणावळ्यात पोहोचणार आहेत. ‘अजय आणि माझ्यासाठी पर्यावरण हा नेहमीच महत्त्वाचा विषय राहिला आहे. आणि ज्या सुंदर परिसरात मी लहानपणी खेळले, तिथे अशा प्रकारची योजना सुरू व्हावी यासारखा आनंद नाही’, अशा शब्दांत काजोलने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर या दोघींच्या ओसंडून वाहणाऱ्या उत्साहात चिंब भिजलेल्या अजयला प्रकाश झांचा ‘सत्याग्रह’ सोडून घरच्या मोहिमेवर पुढाकार घ्यावा लागला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा