अजनी रेल्वे स्थानकाला टर्मिनसचा दर्जा देण्यात आला असून अमरावती इंटरसिटी एक्सप्रेस व काझीपेठ पॅसेंजर या दोन गाडय़ा यानंतर तेथून सुटणार असल्याचे मध्य रेल्वेने जाहीर केले आहे.
रेल्वे बोर्डाने अजनी स्थानकाच्या टर्मिनस दर्जाला मान्यता दिली असून, या स्थानकाचे टर्मिनसमध्ये रूपांतर करण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे यानंतर नागपूर- अमरावती इंटरसिटी एक्सप्रेस आणि नागपूर- काझीपेठ पॅसेंजर या दोन गाडय़ा अजनी स्थानकावरून सोडण्यात येतील, तसेच त्यांचा परतीचा प्रवासही येथेच संपेल.
अमरावती- नागपूर इंटरसिटी एक्सप्रेस यापुढे बडनेऱ्याला न जाता थेट नागपूरला येईल, त्यामुळे तिच्या प्रवासाचा वेळ कमी होईल, अशी माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश दीक्षित यांनी पत्रकारांना दिली. अजनी स्थानकावरून सुटणाऱ्या या दोन गाडय़ांचे वेळापत्रकही दीक्षित यांनी जाहीर केले.
१२१२० अजनी- अमरावती इंटरसिटी एक्सप्रेस सायंकाळी साडेसहा वाजता अजनी स्थानकावरून सुटेल व रात्री ९ वाजून १० मिनिटांनी अमरावती येथे पोहचेल. १२११९ अमरावती- अजनी ही गाडी सकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी सुटून सव्वाआठ वाजता अजनी येथे येईल. ५७१३५ अजनी- काझीपेठ पॅसेंजर रात्री ८ वाजून १० मिनिटांनी अजनी स्थानकावरून सुटेल. पहाटे ३ वाजून १० मिनिटांनी बल्लारशाह स्थानकावर येऊन १० मिनिटांनी ती पुढे रवाना होईल. ५७१३६ काझीपेठ- अजनी पॅसेंजर पहाटे साडेतीन वाजता बल्लारशाह येथे येऊन ४ वाजता रवाना होईल.
सकाळी ११ वाजून १५ मिनिटांनी ती अजनी स्थानकावर येईल. तथापि, अजनी रेल्वे स्थानकावरून या दोन गाडय़ा कधी सुरू करायच्या याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही, असे दीक्षित यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा