गुलाबी थंडीचा हंगाम सुरु होताच ताज्या, हिरव्यागार भाज्यांची स्वस्ताई प्रत्यक्षात अवतरेल आणि महागाईचे चटके काहीसे कमी होतील, अशी आशा बाळगणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांचा नाशिक आणि पुणे जिल्ह्य़ात अवेळी पडलेल्या पावसामुळे भ्रमनिरस होऊ लागला असून भेंडी, गव्हार, टॉमेटो, वाटाणा यासारख्या भाज्या घाऊक बाजारात पन्नाशी गाठू लागल्याने सर्वसामान्यांना अक्षरश घाम फुटू लागला आहे.
घाऊक बाजारात आवक कमी झाल्यामुळे एकीकडे भाज्यांचे दर वाढू लागल्याने किरकोळ बाजारात उत्तम प्रतीचा टॉमेटो, भेंडी ७० ते ८० रुपये किलोने विकली जाऊ लागल्याने या भाववाढीवर कुणाचेही नियंत्रण राहीलेले नाही. ठराविक भाज्यांचे दर गगनाला भिडलेले असताना दुसरीकडे कोबी (१४), पडवळ (१०), रताळी (१६), दुधी ( १४), फ्लावर (१४) अशा भाज्याचे घाऊक दर अजूनही नियंत्रणात आहेत. किरकोळ बाजारात मात्र यापैकी एकही भाजी ४० रुपयांपेक्षा स्वस्त नाही, असे सध्याचे चित्र आहे. पुणे, नाशीक जिल्ह्यातून मुंबईच्या घाऊक बाजारात आयात होणाऱ्या भाज्यांचे दर काहीही असोत मोठय़ा किरकोळ मंडयांमध्ये गवार, भेंडी, फरसबी, टॉमेटो, वांगी, ढोबळी मिरची अशा प्रमुख भाज्या किलोमागे ६० ते ८० अशा ‘फिक्स रेट’नुसार विकल्या जाऊ लागल्याचे यापुर्वीच स्पष्ट झाले आहे. किरकोळ बाजारातील या दांडगाईवर उतारा म्हणून राज्य सरकारने स्वस्त भाजी विक्री योजना सुरु केली आहे. मात्र, या योजनेचा किरकोळ बाजारातील महागाईवर कोणताही फरक पडलेला नाही, असे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातील महागाई कधी कमी होणार, असा सवाल ग्राहक उपस्थित करु लागले आहेत. आवक मंदावल्याने एपीएमसीच्या घाऊक बाजारात उत्तम प्रतीचा टॉमेटो किलोमागे ५५ रुपयांनी विकला जात असताना वाशी, ठाण्यातील काही किरकोळ बाजारात हाच दर ८० ते ९० रुपयांपर्यंत पोहचल्याचे चित्र दिसत आहे.
किरकोळीची दांडगाई सुरु
मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील प्रमुख भाजी मंडयांमध्ये भेंडी, गवार, फरसबी, शेवगा शेंग, वांगी, फरसबी अशा प्रमुख भाज्या ६० ते ८० रुपये किलो अशा ‘फिक्स रेटने विकल्या जाऊ लागल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून टॉमेटोची आवक कमी झाल्यामुळे घाऊक बाजारात उत्तम प्रतीचा टॉमेटो किलोमागे ४५ ते ५५ रुपये रुपयांनी विकला जाऊ लागला आहे. गेल्या सहा महिन्यात तिसऱ्यांना टॉमेटोच्या घाऊक दरांनी पन्नाशी ओलांडली असून शेवगाच्या शेंगाही किलोमागे ८० रुपयांनी विकल्या जात आहेत. कोथींबीरीची एक जुडी घाऊक बाजारात आठ ते दहा रुपयांनी विकली जात असली तरी किरकोळ बाजारात हा दर २० ते २५ रुपयांच्या घरात आहे. आल्याचे दर महिनाभराच्या तुलनेत ऊतरले असले तरी अजूनही ते ६० रुपयांच्या घरात आहेत. त्यामुळे ठाणे, नवी मुंबईतील किरकोळ बाजारात १०० रुपयांनी आल्याची विक्री सुरु आहे.
घाऊक बाजारातील भाज्यांचे दर आणि किरकोळीचे दर यामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे, अशी कबुली एपीएमसीतील ज्येष्ठ व्यापारी गोपीनाथ मालुसरे यांनी वृत्तान्तशी बोलताना दिली. घाऊक बाजारात हमाली, बाजार फी, वाहतुक खर्च तसेच मालाची नासाडीचे प्रमाण लक्षात घेतले तरी ५५ रुपयांचा टॉमेटो किरकोळी बाजारात ७० रुपयांपर्यत मिळायला हवा. मात्र, वाशीसारख्या लगतच्या किरकोळ बाजारात ८० ते ९० रुपयांनी टॉमेटोची विक्री होत असल्याचे पाहून आश्चर्य वाटते, असेही मालुसरे यांनी स्पष्ट केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा