अधूनमधून केली जाणारी वैद्यकीय तपासणी, श्रवण आणि नेत्र चिकित्सा, व्यसनांपासून दूर राहण्यासाठी समुपदेशन, कामाचा ताण हलका करण्यासाठी ध्यानधारणा, योगवर्ग असे एक ना अनेक उपाय योजूनही बेस्टच्या बस-चालकांचा उद्दामपणा किंचितही कमी झालेला नाही. चालकांचा बेदरकारपणा आणि वाहकांच्या उद्दामपणाला आळा घालण्यात बेस्ट प्रशासन अपयशी ठरले आहे. परिणामी बेस्टची प्रतिमाही अधिकाधिक डागाळत चालली आहे.
बेस्टच्या आगारांमध्ये सर्वच कर्मचाऱ्यांसाठी दवाखाना सुरू करण्यात आला आहे. तर चालक आणि वाहकांसाठी आगारांमध्येच प्रजापिता इश्वरीय विश्वविद्यालयातर्फे ध्यानधारणा, योग आदींची व्यवस्था केली आहे. चालक-वाहकांची नियमितपणे वैद्यकीय तपासणी, नेत्र आणि श्रवण तपासणी केली जाते. कामाच्या ताणामुळे ते व्यसनांकडे वळू नये यासाठी त्यांची समुपदेशनही केले जाते. अपघात कसे टाळावेत याबाबतही चालक-वाहकांचे प्रबोधन केले जाते. त्यासाठी बेस्टची फिरती ‘अपघात प्रतिबंध व्हॅन’ प्रत्येक आगारांमध्ये हजेरी लावत असते. या व्हॅनमध्ये दृक्श्राव्य अथवा पोस्टर्सच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात येते. सलग पाच वर्षे अपघातविरहित सेवा देणाऱ्या चालकांना गौरविण्यात येते. सलग तीन वेळा हे पदक मिळविणाऱ्या चालकाला रौप्य पदक देऊन सन्मानित करण्यात येते.
मात्र एवढे सर्व असूनही बस चालक-वाहकांचा उद्दामपणा तसूभरही कमी झालेला नाही. थांब्यावर बस न थांबविणे, प्रवासी बसमध्ये चढण्यापूर्वीच पुढे हाकणे, इतर वाहनांना पुढे जाऊ न देणे, थांबा आणि दुभाजकाच्या मध्येच बस उभी करून वाहनांचा खोळंबा करणे, बसचा वेग सतत कमी-जास्त करीत राहणे, इतर वाहनचालकांशी अर्वाच्च भाषेत बोलणे आदी उपदव्यापांमुळे बेस्टचे बसचालक प्रवाशांच्या टीकेचे धनी झाले आहेत.  पूर्वी बेस्टमध्ये चालकपदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दिंडोशी आगारात एक महिना प्रशिक्षण दिले जात असे. त्यानंतर त्याची परीक्षाही होत असे. त्यानंतरच त्याच्या हाती बसचे व्हील सोपविण्यात येत असे. परंतु काही वर्षांपूर्वी कामगार नेते शरद राव यांनी अचानक आक्रमक पवित्रा घेऊन संपाची घोषणा दिली आणि माजी महाव्यवस्थापक उत्तम खोब्रागडे यांनी तडकाफडकी सुमारे साडेतीन हजार चालकांना रोजंदारीवर सेवेत घेतले. कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण न देताच त्यांच्या हाती बसगाडय़ा देण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांच्या नशिबी गचके खात प्रवास आला. त्याचबरोबर अपघातांचे आणि अन्य वाहनचालकांबरोबर वादावादीचे प्रकारही वाढले. परंतु त्यावर जालीम उपाय करण्यात बेस्ट प्रशासन आजही अपयशीच ठरले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा