दिवाळीपूर्वी ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्याने आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. ११ नोव्हेंबरला ४८५० रुपये प्रतिक्विंटल असलेला लाल कांद्याचा सरासरी भाव पंधरवडय़ात घसरून १७२० रुपयांवर आला आहे. आवक वाढत असल्याने हे भाव आता कोणती पातळी गाठतील याबद्दल शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. केंद्राने निर्यातमूल्य कमी न केल्यामुळे कांद्याची निर्यात थंडावली आहे. या एकूणच परिस्थितीत उत्पादन खर्च भरुन निघेल की नाही या विवंचनेत शेतकरी आहे.
मनमाड बाजार समितीत कांदा भावात कमालीची घसरण सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी २३७५ रुपये असणारा भाव दुसऱ्या दिवशी ६५५ रुपयांनी घसरुन १७२० रुपयांवर आला. या दोन दिवसात बाजार समितीत अनुक्रमे ४३०० आणि ४००० क्विंटल कांद्याची आवक झाली. निफाड व येवला परिसरात दोन दिवसांपूर्वी बेमोसमी पावसाने तडाखा दिला. आसपासच्या परिसरात ढगाळ हवामान आहे. यामुळे कांद्यावर करपा व मावा रोगांचा प्रादुर्भाव होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. या चक्रात सापडलेला शेतकरी भाव घसरल्याने हवालदील झाला आहे. सध्याच्या भावात उत्पादन खर्च भरुन निघण्याचे सांगितले जाते. कोणत्याही नैसर्गिक संकटांचा सामना करावा न लागल्यास साधारणत: एक एकर क्षेत्रात  ६० ते ६५ क्विंटल कांद्याचे उत्पादन होते. उत्पादनाचा संपूर्ण खर्च आणि श्रम विचारात घेतल्यास शेतकऱ्यांना प्रति किलोसाठी १० ते १२ रूपये खर्च येतो. म्हणजे, प्रति क्विंटल कांद्याचा उत्पादन खर्च निव्वळ १००० ते १२०० रूपयांच्या घरात आहे. या परिस्थितीत कांद्याचे भाव ही पातळी गाठण्याच्या मार्गावर आहेत. नाशिक जिल्ह्यातील सर्व प्रमुख बाजार समित्यांमध्ये दिवाळीनंतर कांद्याची आवक वाढून भाव कमी झाले. पण केंद्र शासनाने निर्यातमूल्य ११५० डॉलर प्रतिटन केले. त्यामुळे थंडावलेली निर्यात आता जवळपास बंद झाली आहे. दिवाळीपूर्वी दिल्ली व इतर राज्यात कांद्याचे भाव ८० ते १०० रुपयांच्या घरात गेल्यामुळे ते कमी होण्यासाठी निर्यात कमी करणे हे केंद्राचे धोरण होते. त्यानुसार सरकारने निर्यातमूल्य ४०० वरून ६५० डॉलर केले. तरीही कांद्याचे भाव कमी झाले नाहीत. त्यामुळे हे मूल्य थेट ११५० डॉलर प्रतिटन करण्यात आले. आता कांद्याचे देशांतर्गत भाव घसरल्यावर निर्यातमूल्य कमी करणे आवश्यक होते. निर्यात सुरू झाल्यास स्थानिक बाजारात कांद्याला चांगला भाव मिळू शकेल, असे निर्यातदार व्यापारी अनील सुराणा यांनी सांगितले.
दुसरीकडे कृषी विभागाने जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची १०० टक्के लागवड झाल्याचा अहवाल दिला आहे. पण प्रत्यक्षात खरीपाची उशिरा कापणी व मशागतीने काही ठिकाणी कांद्याची रोपे नाहीत, मजुरांची वानवा आहे. बेमोसमी पावसामुळे कांद्यावर रोगांचा प्रार्दुभाव होत असल्याची चिन्हे दिसत असल्याने शेतकरी जंतुनाशकांच्या फवारणीसाठी धडपड करत आहे. या स्थितीमुळे पुढील हंगामाच्या उन्हाळ कांद्याच्या उत्पादनात मोठी घट येवून पुन्हा उन्हाळ कांद्याचा भाव वाढेल अशी स्थिती आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा