‘व्हॉटस अॅप’ हे जलद संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम. मनोरंजनाचे मेसेजेस, छायाचित्रे आणि व्हिडियोंची या माध्यमातून देवाणघेवाण होते. एखादा मेसेज आला की त्याची साखळी बनते आणि तो पुढे पुढे पसरत राहतो. पण कधी कधी एखादा मेसेजही उपयुक्त ठरत असतो. एका मुजोर रिक्षाचालकाबाबातचा असाच एक मेसेज दोन दिवसांपूर्वी व्हॉटस अॅपवर पसरत होता. या मेसेजची पोलिसांनी थेट दखल घेतली आणि त्या मुजोर रिक्षाचालकाला शोधून त्यावर कारवाई केली.
धनलक्ष्मी खोना (७५) या घाटकोपर पश्चिमेला राहतात. वृद्धापकाळामुळे त्यांना काठीच्या आधारानेच कसेबसे चालता येते. रविवारी त्या घाटकोपर पूर्वेच्या कुकरेजा परिसरात एका कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. त्यांना सोबत म्हणून त्यांची नात ज्योतीही गेली होती. संध्याकाळी घरी परतण्यासाठी त्यांची नात रिक्षा आणण्यासाठी संकुलाच्या बाहेर आली. पण जवळचे भाडे ऐकून रिक्षाचालक येण्यास तयार नव्हता. अर्धा तास झाला तरी एकही रिक्षाचालक येण्यास तयार नव्हता. एक रिक्षाचालक तयार झाला पण तो वृद्ध धनलक्ष्मी खोन यांना घेण्यासाठी आत यायला तयार नव्हता. वयस्कर महिला आहे, चालायचा त्रास होतो, कृपया रिक्षा आत घ्या असे सांगूनही तो तयार नव्हता. त्याची भाषा उद्धट आणि अरेररावीची होती. ‘माझी काय आणि कुठे तक्रार करायची आहे, ती करा मी इथेच थांबतो,’ असे म्हणत त्याने रिक्षा उभी केली. ज्योतीने मग मुंबई पोलिसांच्या शंभर क्रमांकावर दूरध्वनी केल्यावर तेथील महिला पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस ठाण्यात येऊन तक्रार करा, असा सल्ला दिला. ज्योती हतबल झालेली पाहून ‘पाहिलेत तुम्ही काही बिघडवू शकत नाही,’ असे सांगून तो मुजोर रिक्षाचालक तसाच निघून गेला. त्यानंतर मोठय़ा प्रयत्नांतर एक टॅक्सी मिळवून ज्योती आपल्या आजीला घरी घेऊन गेली. तोपर्यंत तिने त्या मुजोर रिक्षाचालकाचा नंबर टिपून ठेवला होता. पोलिसांकडे जाण्यात अर्थ नाही, असे समजून तिने तक्रार केली नाही.
मात्र दुसऱ्या दिवशी याबाबतचा हा प्रसंग तिने व्हॉटस अॅप, फेसबुक आणि ट्विटरवर टाकला. त्यात त्या रिक्षाचालकाचा नंबरही लिहिला. रिक्षाचालकांचा मुजोरपणा हा सर्वसामान्य ग्राहकांना नवीन नाही. त्यामुळे प्रत्येकजण तो मेसेज पुढे पाठवत राहिला. मंगळवारी भल्या पहाटे ज्योतीला पोलीस आयुक्त राकेश मारिया यांचा मेसेज आला. त्या संबंधित रिक्षाचालकावर मोटार वाहतूक अधिनियमाअंतर्गत कारवाई करून त्याचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. या रिक्षाचालकाचे नाव रुद्रप्रताप दीक्षित असे होते. विक्रोळी वाहतूक पोलिसांनी त्याला शोधून ही कारवाई केली होती. कुठलीही तक्रार न करता केवळ व्हॉटस अॅपवर फिरविलेल्या मेसेजवरून पोलिसांनी ही कारवाई केली होती. तर खुद्द आयुक्तांनी तक्रारदाराला एसएमएस पाठवून झालेल्या कारवाईची माहिती दिली होती. पोलिसांच्या या कारवाईने सुखद धक्का बसलेले खोना कुटुंबीय भारावून गेले आहेत. रिक्षाचालकावर कधी कारवाई होईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते असेही ज्योतीने सांगितले. एकीकडे पोलीस ठाण्यात येऊन तक्रार करा, असे सांगणारे नियंत्रण कक्ष आणि दुसरी कडे व्हॉटस अॅपच्या मेसेजची गंभीर दखल घेणारे पोलीस या दोन विरोधाभासांचाही अनुभव आला. व्हॉटसअॅपवरील एक मेसेजही कधी कधी किती उपयुक्त ठरू शकतो, याची प्रचीती यानिमित्ताने आली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा