लोकसभा निवडणुकांनंतर येणाऱ्या विधानसभा, पालिका व पंचायतीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतांच्या बिदागीची तरतूद आत्तापासून करण्यासाठी राजकीय मंडळींनी गल्लीबोळातील तरुणांकडे लक्ष केंद्रित केले असून त्यासाठी त्यांच्यात लोकप्रिय असणाऱ्या क्रिकेटच्या सामन्यांसाठी लाखो रुपयांची बक्षिसे प्रायोजित करण्यात सुरुवात केली आहे. या क्रिकेट सामन्यांमध्ये तरुणांबरोबरच भावी मतदार असणाऱ्या बच्चेकंपनींचाही समावेश होत असून क्रिकेट स्पर्धाच्या नावाने जमलेला अतिरिक्त पैसा खेळपट्टीवर होणाऱ्या पाटर्य़ा आणि दारुकामावर उधळला जात असल्याचे रात्री उशिरा मैदानांवर फेरफटका मारल्यानंतर दिसून येत आहे.
देशात सध्या निवडणुका आणि क्रिकेटचा ज्वर पसरला आहे. त्यामुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत या दोन सामन्यांची चर्चा जोरात सुरू आहे. राज्यात सर्वाधिक क्रिकेटवेड ठाणे आणि रायगड जिल्ह्य़ाला जडल्याचे दिसून येते. त्यामुळे रायगडच्या एक हजार ८५९ व ठाण्याच्या एक हजार ७७२ गावांत आणि तालुका, शहरात सध्या क्रिकेट खेळले जात नाही असे गाव, शहर मिळणे दुर्मीळच आहे. मुंबईलगत असणाऱ्या या दोन जिल्ह्य़ांतील जमिनी विकून शेतकऱ्यांच्या हातात खेळणारा पैसा हे या दोन जिल्ह्य़ांत क्रिकेट स्पर्धा आणि त्यावर होणारा खर्च जास्त असण्याचे कारण असल्याचे दिसून येते. त्यामुळे जमीन विकणारा नवश्रीमंत शेतकरी गावात आपली वट दाखविण्यासाठी या खेळाडूंना लागणारी पहिली तीन पारितोषिके सहज देत आहे. त्यात एकामागून एक निवडणुका असल्याने राजकीय मंडळींनीही मतांच्या तजविजीसाठी या क्रिकेट सामन्यांभोवती प्रायोजकत्वाचे सापळे टाकण्यास सुरुवात केली आहे. रायगड जिल्ह्य़ात तर स्थानिक क्रिकेटवरील बक्षिसांची उलाढाल कोटय़वधी रुपयांच्या घरात आहे.
पनवेल तालुक्यात या सामन्यांवर लाखो रुपयांचा सट्टा लागत असल्याचे स्पष्ट आहे. तळोजा येथे हे बेटिंगचे प्रमाण जास्त आहे. याच रायगड जिल्ह्य़ातील ग्रामस्थ आपली शेती विकून आलेला पैसा डान्स बारमध्ये नर्तिकांवर उडवत असल्याचे लक्षात आल्यानंतर पनवेलचे आमदार विवेक पाटील यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या लक्षवेधीवर गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राज्यात डान्स बार बंदीचा निर्णय लागू केला पण त्याच रायगड जिल्ह्य़ात आता ही नवीन बार संस्कृती उदयास आली असून क्रिकेट सामन्यांच्या नावाने जमलेले पैसे नंतर खेळपट्टीवरच खुलेआम ओल्या पाटर्य़ा करण्यामध्ये खर्च केले जात आहेत. यात मांसाहाराचे तर टोपच्या टोप रिते केले जात असून हे सर्व पोलिसांच्या नजरेसमोर घडत आहे. काही पोलीस ठाण्यांना या पार्टीतील हिस्सा म्हणून आगरी पद्धतीची प्रसिद्ध भाकरी आणि मटण पोहोचविले जात असल्याचे आढळून आले आहे. काही दिवसांपूर्वी बोनकोडे येथील बालाजी टॉवरच्या जवळील एका मैदानावर बच्चेकंपनीने अशाचप्रकारे रात्री उशिरा गाडीतील साऊंड सिस्टीम लावून धुडगूस घातला होता. ही सर्व मुले १८ वर्षांच्या खालील होती. त्यांनी चक्क खेळपट्टीवरच बीयरच्या बाटल्या आणि मटणाच्या टोपांसह मैफल जमवली होती. त्या वेळी बालाजी टॉवरमधील काही रहिवाशांनी त्यांना तेथे जाऊन धोपटले, पण पळून जाताना या ग्रामस्थ मुलांनी चांगल्याच दादागिरीचे दर्शन केले होते. अमुक तमुक संस्थेच्या नावाने एक रंगीत कागदावर क्रिकेट सामन्यांचे आयोजन करीत असल्याचे छापील पत्रक राजकरण्याकडे घेऊन जायचे, त्यावर पहिल्या दोन व उत्कृष्ट गोलदांज फलंदाज क्षेत्ररक्षणाची बक्षिसे जाहीर करायची आणि त्यासाठी स्थानिक राजकारण्याकडे व श्रीमंत दानशूरांकडे पैसे मागायचे अशी ही पैसे उकळण्याची पद्धत आहे. यात स्पर्धेत सामील होणाऱ्या संघाकडून शुल्क स्वरूपात येणारी रक्कम वेगळीच आहे. खिलाडूवृत्ती आणि संयमाची शिकवण
देणारे क्रिकेट आता अशाप्रकारे व्यसन आणि जुगाराचे साधन बनू लागले आहे..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा